जलतरंगावर उमटली टंचाईची दाहकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 11:28 PM2016-04-22T23:28:35+5:302016-04-23T00:24:42+5:30
समुद्रात जाऊन मासे पकडणे, किनाऱ्यावर आल्यानंतर मासळीच्या विक्रीची व्यवस्था करणे यातच गुंतून पडणाऱ्या मच्छीमारांसाठी गेली काही वर्षे हा उपक्रम सातत्याने साजरा होत आहे
रत्नागिरी : डोक्याला मुंडावळ्या आणि कमरेवर कळशी घेतलेली नवी नवरी... मासळीचा दुष्काळ... पाणी वाचवा अभियान... व्यसनमुक्ती.. महिला मच्छीमार यासारख्या अनेक विषयांमधून मच्छीमारांनी आपल्या सामाजिक जाणिवेचे उत्कृष्ट दर्शन घडवले. निमित्त होते फॅन्सी नौका जनजागरण स्पर्धेचे! कमरेवर कळशी घेऊन जाणाऱ्या नव्या नवरीच्या माध्यमातून पाणीटंचाईची दाहकता मांडणाऱ्या जलबिंदू क्रिएशनच्या नौकेने प्रथम क्रमांक मिळवला.
समुद्रात जाऊन मासे पकडणे, किनाऱ्यावर आल्यानंतर मासळीच्या विक्रीची व्यवस्था करणे यातच गुंतून पडणाऱ्या मच्छीमारांसाठी गेली काही वर्षे हा उपक्रम सातत्याने साजरा होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आभार सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, रत्नागिरी व प्रवासधारा, मुंबई यांच्यावतीने गावडे आंबेरे-हनुमानवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त ही ‘फिनोलेक्स चषक फॅन्सी नौका जनजागरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्याला मच्छीमारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मुचकुंदी नदी व पूर्णगड खाडीमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये नौकांवर विविध देखावे करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जलबिंदू क्रिएशनने पटकावला. त्यांना तीन हजार रुपये व फिनोलेक्स चषक देऊन गौरवण्यात आले. अतिरिक्त मच्छीमारीमुळे माशांच्या जाती नष्ट होत आहेत. अशाच पध्दतीने मासेमारी सुरू राहिली, तर भविष्यात २०५०मध्ये मासे पूर्णपणे नष्ट होतील, असा संदेश देणाऱ्या मत्स्य महाविद्यालय, शिरगावला द्वितीय क्रमांक मिळाला. विजेत्याला रोख दोन हजार रुपये व फिनोलेक्स चषक देऊन गौरविण्यात आले. पर्ससीन नेटवरील बंदीमुळे सध्या मासेमारी बंद आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर मासेमारी झाल्याने सध्या मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात काहीही सापडत नसल्याचे विदारक चित्र ‘शिवसागर मच्छिमार सोसायटीेने देखाव्यातून मांडले होते. या देखाव्याला तृतीय क्रमांक मिळाला असून, एक हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्र महिलांनी पादाक्रांत केली आहेत. मच्छीमार कुटुंबातील पुरूषानी मासेमारी केल्यानंतर विक्रीचे काम स्त्रिया करतात. परंतु आज स्त्रिया या क्षेत्रातही मागे राहिलेल्या नाहीत. समुद्रात जाळे टाकून मासेमारी करणाऱ्या महिला असे दोन देखावे विठ्ठल रखुमाई मंडळाने मांडले होते. या मंडळास उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला आहे. व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. त्यामुळे व्यसनमुक्ती झालीच पाहिजे, असा संदेश प्रवासधारा ग्रुपने मांडलेल्या देखाव्यातून देण्यात आला. या गटालाही उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. उत्तेजनार्थ दोन क्रमांकाला ५०० रुपयांची बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. आशिष मोहिते व डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)