पाणीटंचाई कृती आराखड्यास विलंब
By admin | Published: December 14, 2014 09:20 PM2014-12-14T21:20:40+5:302014-12-14T23:52:19+5:30
जिल्हा परिषद : तालुकास्तरावरील आराखडे देण्यात होतेय चालढकल
रत्नागिरी : जिल्हा परिषद संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही. तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आल्याने कृती आराखडा तयार करण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला विलंब होत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही दरवर्षी ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नदी, नाल्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे जनतेला शासनाकडून टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात.
गतवर्षी जून महिन्यात १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावली होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तोही दोन-तीन दिवसांनी एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला पायपीट करावी लागली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावणार असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी डिसेंबरपूर्वी टंचाई कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. मात्र, तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यांना कृती आराखडा सादर करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या.
याबाबत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेतही चर्चा झाली. सभेत टंचाई आराखडा अद्याप तयार का करण्यात आला नाही, आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजूरीसाठी कधी पाठविणार, असे प्रश्न पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती.
नोव्हेंबर महिन्यामध्ये तालुकास्तरावरुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला टंचाई कृती आराखडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी तालुक्यातून अद्याप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आराखडे सादर करण्यात आलेले नाहीत. हे आराखडे येण्यास उशीर झाल्याने जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची धावपळ उडणार आहे. (शहर वार्ताहर)
तालुक्याच्या बैठकाच नाहीत...
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येतो. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा पंचायत समितीकडून मागविण्यात येतो. या आराखड्यासाठी तालुक्यामध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. काही तालुक्यांमध्ये कृती आराखड्याबाबत अजूनही बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कसा पाठविणार, असा प्रश्न पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.