गतवर्षीपेक्षा पाणीटंचाई तीव्र
By admin | Published: April 24, 2016 12:40 AM2016-04-24T00:40:19+5:302016-04-24T00:40:19+5:30
कमी पावसाचे दुष्परिणाम : टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या ६० वर; पाण्यासाठी वणवण सुरू
रत्नागिरी : कमी पाऊस पडल्याचे दुष्परिणाम ऐन उन्हाळ्यात जाणवत असून, आज जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील ३४ गावांमधील ६० वाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आजची पाणीटंचाई गतवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे.
दिवसेंदिवस पाणीटंचाईत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. उन्हाळा सुरु असला तरी गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षीचा उन्हाळा कडक असल्याचे जाणवत आहे. विहिरी, नाले, तलाव, आदी पाण्याचे स्रोत आटत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढण्याची चिन्हे असल्याने भयंकर उकाडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचे बाष्पीभवन जलदगतीने होत असून, जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया झपाट्याने होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील २२ गावांमधील ३६ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती़ या टंचाईग्रस्तांना ६ शासकीय आणि ३ खासगी टँकर्स अशा एकूण ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये आता १२ गावांमधील २४ वाड्यांची भर पडली आहे़ या टंचाईग्रस्तांना शासकीय ८ आणि खासगी २ अशा एकूण १० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे़ मात्र, प्रत्यक्षात त्यांना दोन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ यामुळे टंचाईग्रस्तांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़ दिवसेंदिवस या पाणीटंचाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)
दापोलीत १५ गावांना पाणीटंचाईच्या झळा!
दापोली : दापोलीतील पंधरा गावांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने येथून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली असून, देवाचा डोंगर येथे मात्र मार्च महिण्यापासूनच टँकर धावू लागला आहे.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. तसेच उन्हाचा कडाका देखील दिवसेंदिवस वाढत चालला असून, दापोलीतील काही गावांमधील पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मार्च महिन्यापासूनच जामगे देवाचा डोंगर व मंडणगड मधील भोलवली देवाचा डोंगर येथे पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. परंतु, उन्हाचा कडाका पाहता भविष्यातील पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. आंजर्ले, ओनणवसे, मुर्डी, उंबरशेत, नवसे, केळशी, उटंबर, आतगाव, कौडोली, रावतोली, चिखलगाव, शिरखळ, उन्हवरे, फरारे, उंबर्ले या गावांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या गावांची पाहणी देखील करण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी पाण्याचे टँकर पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)