राजापूरवासीयांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना, गुढीपाडव्यानंतर पाणीपुरवठा वेळेत कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:37 PM2023-03-21T18:37:16+5:302023-03-21T18:39:02+5:30
राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते
राजापूर : वाढते उष्ण तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतर २३ मार्चपासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून एक तासाऐवजी पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. ही माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. रानतळे परिसरात आतापासूनच विंधन विहिरीला पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावरच शहरवासीयांना पाणीपुरठा करावा लागणार आहे.
आता कोदवली येथील जुने धरण व शीळ जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. कोदवली धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. तर शीळ जॅकवेलकडून २४ तास विद्युत पंपाने तालीमखाना साठवण टाकीत पाणी खेचले जात आहे. मात्र, पावसाळा साधारण १५ जूनपासून सुरू होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
नळाद्वारेच पाणीपुरवठा
नगरपरिषद प्रशासनाने प्राथमिक तयारी केली असून, शहरवासीयांना टंचाई काळात जास्तीत जास्त नळाद्वारेच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. कोदवली धरणाच्या वरील बाजूला दोन बंधारे बांधून पाणी साठविण्यात आले आहे. हा पाणीसाठा धरणात सोडून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, तो पुरेसा नाही. उपलब्ध पाणीसाठ्यावर यावर्षी टँकर न वापरता पाणीपुरवठा सुरळीत करता येतो का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कोदवली धरणातील गाळ उपसणार
नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून कोदवली धरणात साचलेला गाळ उपसून पाणीसाठा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मात्र, धरणातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर गाळ उपशाचे काम करणे शक्य आहे. मे महिन्यात या धरणात साचलेला गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशांत भोसले यांनी सांगितले.
निधीअभावी काम रखडले
काेदवलीतील नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यालाही निधी उपलब्ध होताच काम पूर्ण होणार आहे. मात्र, यावर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार एवढे मात्र नक्की.