Ratnagiri news: पाणीटंचाईच्या झळा; दरवर्षीप्रमाणे पाण्याचा पहिला टँकर यंदाही खेडमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 07:20 PM2023-03-14T19:20:47+5:302023-03-14T19:21:10+5:30
येत्या काही दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता
खेड : जिल्ह्यातील पहिला टँकर धावण्याची परंपरा यंदाही खेड तालुक्याने कायम ठेवली आहे. ऐन शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असल्याने तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर पोसरे बुद्रुक–सडेवाडी येथे सुरू करण्यात आला आहे.
दरड दुर्घटनेत पोसरे बुद्रुक-सडेवाडी येथील नळपाणी योजना जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे येथील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन २४ फेब्रुवारीलाच ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरसाठी पंचायत समितीकडे अर्ज केला होता. त्यानंतर शासकीय कागदोपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आता टँकर सुरू करण्यात आला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला असून पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऐनवली– बंगालवाडी येथे तालुक्यातील पाण्याचा पहिला टँकर १४ फेब्रुवारीपासून धावला होता. यावर्षी पोसरे बुद्रुक सडेवाडीला चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
यापाठोपाठ केळणे येथील भोसलेवाडी व मांगलेवाडी ग्रामस्थांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षणानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.