चिपळुणातील पाणीपुरवठा, स्वच्छतेवर भर : वैभव विधाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:25+5:302021-07-28T04:33:25+5:30
चिपळूण : शहरात महापूर आल्यानंतर आता स्वच्छता आणि वीजपुरवठा सुरळीत नसलेल्या भागात पाणी पुरवठा करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात ...
चिपळूण : शहरात महापूर आल्यानंतर आता स्वच्छता आणि वीजपुरवठा सुरळीत नसलेल्या भागात पाणी पुरवठा करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसात चिपळूण शहर पूर्वपदावर आणू, असा विश्वास मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी व्यक्त केला आहे.
नगर परिषदेचे कर्मचारी अपुरे पडत आहेत, अशा वेळी अन्य पालिकांकडून कर्मचारी मागवण्यात आले आहेत. तीनशे माणसे सध्या काम करीत आहेत. मुंबई महापालिकेकडून यंत्रणा व १० कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. २३ डंपर, आठ जेसीबी, फवारणीसाठी पाच गाड्या, बारा टँकर, अग्निशामन दलाच्या तीन गाड्या कामाला लावण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथून कर्मचारी बळ मागविण्यात आले आहे. शहरातील इमारतींच्या टाक्यांमध्ये औषधे टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यानंतर घरोघरी औषधांचे वाटप होईल, असेही डॉ. विधाते यांनी सांगितले. ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे, त्या ठिकाणचे स्ट्रीटलाईट सुरू करण्यात आले आहेत. कचरा उचलला जाईल, फवारणी केली जाईल व तीन दिवसात चिपळूण शहर पूर्वपदावर आणले जाईल, असे डॉ. विधाते यांनी सांगितले.
---------------------------------
चिपळूण नगर परिषदेत नियंत्रण कक्ष
शहरात आलेल्या महापुरानंतर नागरिकांच्या मदतीसाठी व सहकार्यासाठी चिपळूण नगर परिषदेत तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नगर परिषदेचे महापुरात मोठे नुकसान झाले आहे. पाणी, विद्युत, वाहन विभागाची कागदपत्रे वाहून गेली आहेत. पालिकेच्या आवारात असणारा चिखल काढण्यात आला असून, खालीच नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी दिली आहे.
---------------------------------
चिपळूण बाजारपेठेतील चिखल हटवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अत्याधुनिक यंत्रणा आणण्यात आली आहे.