चिपळुणातील ९ गावांना एका टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:22+5:302021-04-27T04:32:22+5:30
चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांच्या मागणीनुसार स्थानिक प्रशासनामार्फत खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, शासकीय टँकरच उपलब्ध नसल्याने या टंचाईग्रस्त गावांना अवघ्या एका टँकरव्दारे पाणी पुरवले जात असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आणखी एक टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावते. पाण्यासाठी असंख्य कुटुंबांना वणवण करावी लागते. यामध्ये महिलांचे प्रचंड हाल होतात. सध्या कडक उन्हाळा सुरू असून, अनेक गावांमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे अशा गावांनी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, आकले, ओवळी, गाणे व कादवड आदी ९ गावांमधील १६ वाड्यांचा यात समावेश आहे.
यामध्ये ६ धनगरवाड्या आहेत. शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर येथील महसूल प्रशासनाने एक खासगी टँकर अधिग्रहित केला. सध्या या टँकरव्दारे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, एकच टँकर या सर्व गावांमधील वाड्यांमध्ये धावत असल्याने या गावांना वेळेत पाणीपुरवठा होत नाही. याशिवाय केला जाणारा पाणी पुरवठाही अपुरा पडत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चिपळूण पंचायत समिती प्रशासनाने आणखी एक खासगी टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.