टँकरने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:21+5:302021-04-03T04:27:21+5:30
रत्नागिरी : नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत कायमचीच ओरड सुरू आहे. कमी दाबाने पुरवठा होत आहे. त्यातच आता नगर ...
रत्नागिरी : नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत कायमचीच ओरड सुरू आहे. कमी दाबाने पुरवठा होत आहे. त्यातच आता नगर परिषदेने काम काढल्याने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यासाठी हजारो रुपये लोकांना मोजावे लागत असल्याने तीव्र नाराजी उमटत आहे.
कांद्याचे दर घसरले
रत्नागिरी : कांद्याचे दर घसरले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ५० रुपयांना ३ किलो कांदे विक्री सुरू आहे. १० किलोंची पिशवी २०० ते २१० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. १८ ते २० रुपये किलोदराने किरकोळ विक्री सुरू आहे. बटाटा मात्र २० ते २५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
प्रशिक्षणासाठी अमाप खर्च
रत्नागिरी : २०१९ मध्ये साडेतीन हजार जागांसाठी पोलीस भरती जाहीर झाली होती. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप रखडली आहे. काही महिन्यांपूर्वी जंबो भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आरक्षण व इतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती पुन्हा रखडल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मात्र अमाप खर्च होत आहेत.
सर्वत्र धुळीचे साम्राज्य
लांजा : तालुक्यातील दाभोळे, शिपोशी, कोर्ले, वाटूळ रस्त्याचे नूतनीकरण, विस्तारिकरणाचे काम सुरू झाले आहे. गेल्या महिन्यापासून काम सुरू झाले असले, तरी अतिशय संथगतीने होत असल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील मोऱ्या दुरुस्तीच्या कामावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
प्रकल्पग्रस्तांसाठी पूल मंजूर
खेड : तालुक्यातील किंजळेतर्फे नातू गावासाठी पूल मंजूर झाला आहे. किंजळेतर्फे नातू हे प्रकल्पग्रस्त गाव असून, या पुलाचे काम लवकर होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कॉजवेवरून वाहतूक सुरू असते, परंतु अतिवृष्टीने वाहतूक बंद झाली, तर ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. आरोग्यसेवाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे.
फेस्टिव्हल स्पेशल दर सोमवारी धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गांधीधाम, तिरुनेलवेल्ली सुपरफास्ट साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल गाडीला दिनांक २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, ही फेस्टिव्हल स्पेशल दिनांक ३ मे ते २८ जूनअखेर दर सोमवारी धावणार आहे. परतीच्या प्रवासात ६ मे ते ३१ जुलै या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे.
शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद
देवरुख : धामापूरतर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संवेदना संघटना यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र माखजन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन अनिरुद्ध निकम यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
मच्छी विक्रेत्यांसाठी अपुरी जागा
रत्नागिरी : नगर परिषदेच्या हद्दीतील भाट्ये खाडीच्या किनारी असलेल्या राजीवडा गावातील लोकांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायावर गावातील हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यासाठी या गावात मच्छी बाजार भरतो. मात्र, त्यासाठी जागा अपुरी पडते. म्हणून नगर परिषदेने आरक्षित जागेवर मच्छी मार्केट बांधावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.