धनगर वस्तीत खासगी टँकरने पाणीपुरवठा-
By admin | Published: March 29, 2016 10:34 PM2016-03-29T22:34:39+5:302016-03-30T00:02:09+5:30
-लोकमतचा प्रभाव
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील अडरे, अनारी, कोंडमळा आणि सावर्डे या धनगरवाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, होत असलेले स्थलांतर आणि पाणीटंचाईची दाहकता याबाबतचे अचूक चित्रण ‘लोकमत’ने वृत्तातून केले होते. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या पूजा निकम यांच्या विनंतीला मान देत चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील यानी धनगरवाड्यावर जाऊन पाणीटंचाईची पाहणी केली. निकम यांनी धनगर बांधवांना पाण्याचा पहिला टँकर दिला.
धनगरवाड्यांत पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पूजा निकम यांनी सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, शौकत माखजनकर, कोंडमळा उपसरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषद सदस्य रसिका म्हादे यांच्यासह धनगरवाड्यांनी कोंडमळा निवाचीवाडी माळावर थाटलेल्या छावणीवर जाऊन त्यांची विचारपूस केली. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी त्यावेळी धनगर बांधवानी केली होती. धनगर बांधवांना शासनाचा टँकर येत नाहीत, तोपर्यंत आपण स्वत:च्या पैशांतून पाणी देऊ, असे निकम यांनी आश्वासन दिले. पाण्याची दाहकता लक्षात घेऊन तहसीलदार वृषाली पाटील यांनी धनगरवाड्यांची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: येऊ, असे निकम यांना सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये धनगरवाड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वाड्यांची पाहणी केली.
यंदा पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवला जाईल. मात्र, पुढील वर्षी आपण वाड्यावर व रस्त्यावर असणारे विहिरींचे रुंदीकरण व खोदाई करून बांधकाम करण्याचा तसेच प्रत्येक वाडीला शेततळे देण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी कोंडिबा बावदाने, चंद्रकांत खरात, शंकर खरात, रामचंद्र गोरे, शांताराम बावदाने, बबन खरात, रायबा खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
कर्तव्य दक्ष तहसीलदार
धनगर बांधवांच्या पाणीटंचाईचा जटील प्रश्न लक्षात घेता पाण्याची दाहकता आणि धनगर बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष धनगरवाड्यांवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. अतिदुर्गम भागात येऊन वृषाली पाटील यांनी केलेल्या या दौऱ्यामुळे चिपळूण तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी सापडल्याची प्रतिक्रिया यावेळी धनगर बांधवांनी व्यक्त केली.
धनगरबांधवांचे
चेहरे खुलले
पाण्यासाठी वणवण करणाऱ्या धनगरवाडीवर पूजा निकम यांनी टँकर देताच त्यांचे चेहरे खुलले. सावर्डे ग्रामपंचायत व कोंडमळा ग्रामपंचायतीच्यावतीनेही पाण्याचे टँकर दिले जातील, असे दोन्ही ग्रामपंचायतींनी आश्वासन दिले आहे.