चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:06 PM2023-04-18T19:06:57+5:302023-04-18T19:07:15+5:30

तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात नाही

Water supply to 6 villages and 8 wadis in Chiplun taluka through 2 private tankers | चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

चिपळुणात पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकरवर मदार, उन्हाची दाहकता वाढली

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : उन्हाची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. परिणामी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ६ गावे आणि ८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे या गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजनांच्या उद्भव विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडतात. परिणामी संबंधित गावांना टँकरमधून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सर्वप्रथम टंचाईचा तडाखा हा उंच डोंगरावर वसलेल्या धनगरवाड्यांना बसतो आहे.

धनगरवाड्यांसाठी पाणी योजना राबवल्या असल्या तरी तेथील पाणीसाठा कमी होत असल्याने टंचाईची झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील अडरे, अनारी, टेरव, कोंडमळा, सावर्डे, गुढे या ६ गावांतील ८ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना २ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.

दसपटी विभागातील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावर्षी पावसाळ्यापूर्वी धरण दुरुस्ती होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे सावर्डेसाठी असलेल्या धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी येथील काही वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रामपूर तांबी धरणाला गळती लागल्याने गेल्या काही वर्षातील या धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावोगावी कोट्यवधी खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. या पाणी योजनांच्या पूर्तीनंतर टंचाईला आळा बसण्याची आशा आहे.

Web Title: Water supply to 6 villages and 8 wadis in Chiplun taluka through 2 private tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.