सांगायचा पाणी, विकायचा गोवा बनावटीची दारू; चिपळुणात पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:53 PM2022-11-04T16:53:09+5:302022-11-04T16:53:34+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून येथे हा साठा केला जात होता. मात्र, परिसरातील लोकांना पाण्याची बॉटल असल्याचे सांगण्यात आले हाेते.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते सुमारे २४ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारूची कारवाई ताजी असतानाच बुधवारी रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी सुमारे ४ लाख ७२ हजारांचा दारूसाठा जप्त केला आहे. तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी येथे एका घरात हा साठा जप्त करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे हा साठा केला जात होता. मात्र, परिसरातील लोकांना पाण्याची बॉटल असल्याचे सांगण्यात आले हाेते.
या साठ्याप्रकरणी राजाराम तानाजी जोईल (५०, रा. पागनाका, चिपळूण) याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवा बनावट दारूची वाहतूक करणारा कंटनेर ताब्यात घेत २४ लाख ४५ हजार रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली हाेती. या कारवाईनंतर कळंबस्ते गमरे बौद्दवाडी येथील मधुकर गमरे यांच्या घरात गोवा बनावटीच्या दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री १० च्या सुमारास कळंबस्ते येथे गमरे याच्या घरावर छापा टाकला.
या कारवाईत सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळला. या घरात दारूचे सर्व बॉक्स एका ४०७ टेम्पोमध्ये भरले हाेते. त्यामुळे कंटेनरमधील दारूपेक्षाही अधिक प्रमाणात दारू घरामध्ये आढळली. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळुखे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत नेमके किती बॉक्स ताब्यात घेतले, याचे स्पष्टीकरण केलेले नाही.
कंटनेरमधील दारूशी चिपळूण कनेक्शन?
दोन दिवसापूर्वी कळंबस्ते येथे एक कंटेनर जप्त केला हाेता. त्याच परिसरात एका घरात त्याच पद्धतीची लाखो रूपयांची गोवा बनावटीची दारू आढळल्याने कंटेनरमधील दारू याच ठिकाणी नेली जात होती का, अशी चर्चा सुरू आहे. कंटेनर प्रकरणी अटक केलेली व्यक्ती पुणे हवेली येथील असून, नाशिक येथे जाणारा कंटेनर कोकणातून का नेला जात होता, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
भाड्याचे घर
घरात दारूचा साठा केल्याप्रकरणी पाग येथील राजाराम जोईल याला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या घरात गोवा बनावटी दारूचा साठा सापडला ते घर भाड्याचे असल्याची माहिती पुढे येत आहे.