मोरवणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, लघु पाटबंधारे विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 02:49 PM2019-07-11T14:49:14+5:302019-07-11T14:49:51+5:30
चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला गळती लागल्याने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. मोरवणे नदीमध्ये हे पाणी सोडण्यात येत असून, या धरणाची पाहणी लघुपाटबंधारे विभाग तसेच आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, त्याला गळती लागल्याने पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. मोरवणे नदीमध्ये हे पाणी सोडण्यात येत असून, या धरणाची पाहणी लघुपाटबंधारे विभाग तसेच आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
मोरवणे धरणाची क्षमता ३ टीएमसी असून, सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तिवरेसारखी दुर्घटना घडू नये, यासाठी अगोदरच खबरदारी घेण्यात आली आहे. या धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल पाठवण्यात आला आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बौद्धवाडी, चर्मकारवाडी आणि खालच्या वाडीतील लोक रात्री जागे राहून पहारा करीत आहेत.
ग्रामस्थ भयभीत असल्यामुळे धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. पाटबंधारेचे उपअभियंता एस. के. सोनवणे, शाखा अभियंता प्रकाश खताते व सहकारी यांनी धरणाची पाहणी केली.
आमदार सदानंद चव्हाण यांनी मोरवणे धरणाकडे जाताना ग्रामस्थांशी संवाद साधला. या धरणावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा, सांडवा तसेच जॅकेवलची दुरुस्ती करावी, झाडीझुडपे तोडण्यात यावी, भिंतीचे अर्धवट पिचिंगचे काम पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. येथील कालव्याला ठिकठिकाणी गळती असल्याने हे पाणी शेतात घुसून नुकसान होणार असल्याने जेसीबी आणून कालव्याला बांध घालण्यात आला आहे.
चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजू जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष समीर काझी, काँग्रेसचे युवक अध्यक्ष फैसल पिलपिले, मोरवणेचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव, जितेंद्र शिंदे आदींनी धरणाची पाहणी केली.
कालव्याला बांध
या धरणाच्या कालव्यांना ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यामुळे हे पाणी शेतात घुसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात या कालव्याला बांध घालण्यात आला आहे.