Waterfalls in Konkan: पर्यटकांना खुणावतो मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:36 PM2024-07-22T12:36:30+5:302024-07-22T12:36:47+5:30
दुधाळ व फेसाळणारा असा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी
- सचिन मोहिते, देवरुख
सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार शालूने नटलेल्या उंचच उंच डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे विहंगम नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. याठिकाणचा उंचावरून काेसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणावा लागेल.
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्री तालुक्यातीलच नाही तर राज्यभरातून लाखो भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने दाखल हाेतात. मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरुख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. तर कोल्हापूरकडून येताना आंबा घाट कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे. या देवस्थानच्या समोरील बाजूस उंचच उंच हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आहेत.
या डोंगररांगातून सात छोटे-छोटे धबधबे प्रवाहित आहेत. हे धबधबे उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याला जाऊन मिळतात. त्यामुळे देवस्थानच्या समोरून दिसणारा मोठा धबधबा पावसाळ्यामध्ये धुवाॅंधार वाहत असतो. दुधाळ व फेसाळणारा असा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी हाेते. उंचावरून काेसळणारा धबधबा, प्राण्यांचा - पक्ष्यांचा किलबिलाट अशा आल्हाददायक वातावरणात अनेक पर्यटक आपला वेळ घालवतात.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व वाट आहे. मात्र, पावसाळ्यात हा धबधबा अति प्रवाहित असतो. त्यावेळी धबधब्याखाली आंघोळ करणे धोक्याचे आहे. सातत्याने उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे येथे तलावसदृश्य स्थिती निर्माण हाेते. त्याची खोलीही मोठी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. तशा प्रकारचे सुरक्षा फलकही याठिकाणी लावण्यात आले आहेत.