Waterfalls in Konkan: पावसाळी पर्यटनात भाव खाऊन जाणारा ‘सवतकडा’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:29 PM2024-07-22T12:29:55+5:302024-07-22T12:32:01+5:30
‘स्लेट टाइप’ टप्पे त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असाच हाेताे भास
- विनोद पवार, राजापूर
निसर्गाच्या कुशीत चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचा ‘सवतकडा धबधबा’ आता राज्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूरहून मुंबईकडे जाताना १२.५० किलाेमीटरवर डाव्या बाजूला शिवणे हा रस्ता जातो. तिथून ६.५० किलाेमीटर उजव्या बाजूला ४ किलाेमीटर अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे गाडी लावून १ किलाेमीटर निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा दृष्टीस पडताे.
मंदरूळ, वाटूळ, चुनाकोळवण परिसरात रांगोळीचा दगड मोठ्या प्रमाणात आहे. ‘स्लेट टाइप’ दगडामुळे, दगडाचे वेगवेगळे टप्पे तयार होतात. त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असाच भास हाेताे. हा संपूर्ण भाग डोंगरदऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर ३-४ ठिकाणी छोटे-मोठे धबधबे आढळतात.
राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील ‘सवतकडा धबधबा’ हळूहळू सर्वांनाच परिचित हाेऊ लागला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी दूरदूरवरील पर्यटक या ठिकाणी येत आहेत. गावामधील सुतारवाडी येथे असणाऱ्या ‘सवतकडा धबधब्या’च्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा-पुन्हा या ठिकाणी येण्याची ओढ लागतेच. त्यामुळे जूनपासून ते अगदी गणपती, दिवाळीपर्यंत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
भरपावसात अंगाला येणारा घामाचा दर्प, शिणवटा हा निसर्ग पाहत असताना कुठल्या कुठे दूर पळून जातो, ते कळतच नाही. मात्र, धबधब्याकडे उतरत असताना पाय घसरून पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उत्साहाबराेबरच सावधानता हवीच. धबधब्याजवळ पोचताच शुभ्र जलधारा पाहून आपलं मन मोहरून जातं.