Waterfalls in Konkan: आंबोली धबधब्याने वर्षा पर्यटन बहरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:41 PM2024-07-22T12:41:55+5:302024-07-22T12:42:27+5:30
पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक
- अनंत जाधव, सावंतवाडी
आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी ‘हाॅट स्पाॅट’ मानले जाते. धबधब्यांचा नजराणा तर पर्यटकांना खुणावत असतो. त्यामुळे आंबोली घाटातील धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. उंच उंच धबधब्यांमुळे तर आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरून जात असते.
पावसाळ्यात आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी हजारो पर्यटक येत असल्याने प्रशासनाकडूनही अतिउत्साही पर्यटकांना लगाम घालण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. यातून काहीसा पर्यटकांचा हिरमोड होताना दिसतो. कारण शनिवारी व रविवारी आंबोलीत तुफान गर्दी असल्याने या गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. त्यामुळेच प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
आंबोली हा वर्षा पर्यटनाचा हाॅट स्पाॅट मानला जातो. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक हे आंबोलीत येतात. या पर्यटकांमध्ये विशेषत: कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील तर शेजारील बेळगाव, गोवा राज्यातूनही पर्यटक येत असतात. हे सर्व पर्यटक आपल्या खासगी गाड्या घेऊन येतात. आंबोलीतील धबधब्याकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. एकाचवेळी पर्यटकांच्या गाड्या आणि माणसे धबधब्यावर जायची म्हटली तर वाहतूक कोडींचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच सहसा प्रशासन अवजड वाहने किंवा पर्यटकांची वाहने ही एकाच ठिकाणी पार्क करण्यास भाग पाडते. त्यामुळेच आंबोलीत वर्षा पर्यटनादिवशी वाहतूक कोंडी होताना दिसत नाही.
आंबोली घाटक्षेत्रात तब्बल सात ते आठ छोटे-मोठे धबधबे आहेत. या सर्व धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यापूर्वी मुख्य धबधब्यावर गर्दी होताना दिसत होती. पण आता पर्यटक इतर धबधब्यांचा आनंद लुटत असल्याने एकाच धबधब्यावर गर्दी होताना दिसत नाही. या सर्व धबधब्यांना प्रशासनाकडून वेगळाच ‘लूक’ देण्यात आला आहे. या धबधब्यांवर पर्यटकांसाठी खास शिडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे धबधब्यावर चढलेला पर्यटक हळूहळू खाली येऊ शकतो, हे विशेष.
अतिउत्साही पर्यटकांना लगाम
आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होत असते. पण आता पर्यटकांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना धबधब्यावर एन्ट्री ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांना लगाम लागला आहे.
माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास कारवाई
आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. या माकडांना पर्यटक आपल्याकडील खाद्यपदार्थ देत असतात. पण आता वन विभागाकडून माकडांना खाद्यपदार्थ दिल्यास दंड आकारण्यात येईल, असे फलक लावण्यात आल्याने यावर थोडे निर्बंध आले आहेत.
वन विभागाची खास मोहीम
वन विभागाने घाटात कचरा टाकणाऱ्यांना वेगवेगळे दंड लावले आहेत. त्यामुळे घाटातील कचरा कमी झाला आहे. तसेच वन विभागाचे कर्मचारीही आंबोली घाटात ठाण मांडून असतात.