दाभोळ खाडीतील चिनी नौका परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:18 PM2019-09-23T17:18:52+5:302019-09-23T17:20:29+5:30
गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत.
दाभोळ : गेले चार महिने दाभोळ मध्ये चर्चेत असणाऱ्या चिनी नौका परतीच्या मार्गावर लागलेल्या आहेत. दहापैकी आठ बोटींना दाभोळ समुद्राच्या बाहेर पाठवण्यात आले असून, उर्वरित दोन नौका अद्यापही दाभोळ बंदराबाहेर उभ्या आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच काही चिनी नौका दाभोळ बंदरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यात आणखी नौकांची वाढ होऊन त्या १० झाल्या. तुफानी वारा आणि पावसाळी वातावरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना दाभोळ खाडीमध्ये आसराही देण्यात आला. पण या मासेमारी करणाऱ्या चिनी नौका इतक्या दूर नेमक्या कशासाठी आल्या होत्या याचे उत्तर दाभोळ ग्रामस्थांना अद्याप मिळालेले नाही.
यासंदर्भात दाभोळ बंदर निरीक्षक महानवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाभोळ बंदरात उभ्या असणाऱ्या दोन नौका (क्र. ५८, ६२) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आल्याचे सांगितले. काही बिलांच्या रक्कमा दिल्या गेल्या नसल्याने दाभोळ कस्टम विभाग व बंदर खाते यांनी त्यांना क्लिअरन्स परवाना देण्याचे नाकारले आहे.