corona virus-कोरोनाच्या भीतीने आखाती नोकरदार परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 04:51 PM2020-03-07T16:51:39+5:302020-03-07T16:57:23+5:30
कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.
रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा झपाट्याने होत असल्याने आखाती प्रदेशात नोकरीला गेलेल्या मंडळींवर नोकरीचे संकट उद्भवले आहे.
आखातील प्रदेशातच नव्हे; तर देश-विदेशातून परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे हॉटेल्स, लॉजिंग्स, वाहतूक व्यवसायावर परिणाम झाला आहे.
काम नसल्याने या क्षेत्रातील नोकरदारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. वाहन चालक, वेटर, शेप, गाईड, सफाई कामगार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कित्येक मंडळींना कामच नसल्याने संबंधित कंपन्यांनी मायदेशी परत पाठविले आहे. सौदी अरेबिया, कुवेत, मस्कत, दुबई येथून कित्येक कोकणी मंडळी काम नसल्याने परत आली आहेत. परदेशातील काही कंपन्यांनी मात्र भारतात सुट्टीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावले आहे.
कोकणातील अनेक मंडळी आखाती प्रदेशात कार्यरत आहेत. परदेशातील मंडळी वर्षातून एक महिना भारतात सुट्टीवर येतात. त्यामुळे सुट्टीसाठी आलेल्या भारतीयांना ८ मार्चपर्यंत कामावर हजर होण्यासाठी तातडीची सूचना काढली आहे, अन्यथा नंतर येणाऱ्या मंडळींना भारतीय राजदुतावासांतर्गत वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सादर करून हजर व्हावे लागेल, अशी सूचना केल्याने अनेक भारतीय नोकरीसाठी परदेशात परतीच्या मार्गाला लागले आहेत.
यामध्ये कोकणातील युवकांचाही समावेश आहे. अस्थैर्याचे हे संकट टाळण्यासाठी अनेकांनी सुट्टी अर्ध्यावर टाकून नोकरीच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली आहे.
मांसाहारावर परिणाम
कोरोना व्हायरसचा धसका रत्नागिरीकरांनीही घेतला आहे. त्यामुळे कित्येकांना चिकन खाणे बंद केले आहे. याचा परिणाम चायनीज विक्रेत्यांवर झाला आहे. चिकन विक्री करणाऱ्यांनी खप थांबल्याने दरच खाली आणले आहेत.
शहरातील ठिकठिकाणी चिकन विक्रेत्यांच्या दुकानात ३५ रूपये किलो दराने विक्री सुरू होती. जेमतेम १० टक्केच मंडळी चिकन खात आहेत. त्यामुळे दिवसाला १५० ते २०० किलो चिकन विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे व्यवसाय मंदावले आहेत. ग्राहकांची वाट पाहात विक्रेत्यांना दुकानात बसावे लागत आहे.