अकरावी प्रवेशाचा मार्ग सोपा अन् कठीणही
By admin | Published: June 10, 2016 12:08 AM2016-06-10T00:08:36+5:302016-06-10T00:16:08+5:30
आवडीला मुरड? : वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न महाविद्यालयांकडे ओढा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार ५३९ विद्यार्थी बसले होते, पैकी २६ हजार ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १४० महाविद्यालयांतून २६ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा ४८९ इतक्या जागा जास्त आहेत. परंतु आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांना थोडे अवघड, थोडे कठीण झाले आहे.
जिल्ह्यातील १४० कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेमध्ये विद्यार्थीसंख्या ७६००, वाणिज्य शाखेत ७४४०, विज्ञान शाखेत ८८४०, तर संयुक्त शाखेच्या ३४८० इतक्या जागा मिळून अकरावी प्रवेशासाठी २६ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश जेवढा सोपा तेवढाच अवघड झाला आहे.
दहावी, बारावी निकालामध्ये कोकण मंडळ सतत अग्रक्रमी राहिले आहे. दरवर्षी प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असताना एकही विद्यार्थी प्रवेशापासून अद्याप वंचित राहिलेला नाही. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा ४८९ इतक्या जागा जास्त असल्याने त्या रिक्त राहणार आहेत. अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करतात, दहावीनंतर इंजिनिअर, डिप्लोमाकडे वळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरातील महाविद्यालयाकडे जातात.
ग्रामीण भागात शाळेशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयापेक्षा शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी गर्दी करतात. विज्ञान, वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करतात. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पालक, विद्यार्थ्यांचा आग्रह असल्यामुळेच प्रवेश प्रक्रिया जटील बनते. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जात असला तरी काही प्रवेश राखीव ठेवले जातात. संस्था चालकांच्या संमत्तीने प्रवेश मिळविले जातात. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीबरोबर पैसेही मोजले जातात.
वास्तविक प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अल्प आहे. परंतु पालक आपल्या इच्छेनुसार प्रवेश घेतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अभ्यासात कमी पडताना दिसतात. अखेर वर्ष पैसे, श्रम वाया जातात. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्या शाखेत प्रवेश घेतला तर नक्कीच योग्य होईल.
सध्या डाएटतर्फे विद्यार्थी कलचाचणी सुरू आहे. या चाचणीव्दारे विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेची आवड आहे, हे स्पष्ट होणार आहे. विनाकारण प्रतिष्ठेसाठी एखाद्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आवडीच्या शाखेत घेऊन तसेच येणे - जाणे सोपे होईल, अशाच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)