बारसू - सोलगाव भागात ‘एनजीओ’ आल्यास दणका द्यायला आम्ही सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:31+5:302021-06-29T04:21:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : आम्ही सुज्ञ आहोत आणि आमच्या मुलाबाळांचे भवितव्य जाणून आहोत. तेव्हा नाणारनंतर आता बारसू - ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : आम्ही सुज्ञ आहोत आणि आमच्या मुलाबाळांचे भवितव्य जाणून आहोत. तेव्हा नाणारनंतर आता बारसू - सोलगाव भागात पर्यावरण रक्षणाचे तुणतुणे घेऊन प्रकल्पविरोध करायला जर एनजीओंचे सेटिंग तज्ज्ञ दलाल आले तर त्यांना चांगलाच दणका देण्याची तयारी आम्ही स्थानिकांनी केली आहे, असा इशाराच राजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि बारसू येथील बागायतदार हनिफ काझी यांनी दिला आहे.
हनिफ काझी यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले की, पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली प्रकल्पांना विरोध करून झाल्यावर प्रकल्पांकडे सेटिंगला बसणारे दलाल आता नव्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. प्रकल्पातील ग्रामस्थांकडे परत तीच घासूनपुसून जुनी झालेली कारणे सांगून येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी आम्ही दक्ष असून, अशा एनजीओंना शहरासह प्रकल्प भाग दणका देण्याच्या तयारीत असल्याचा इशारा काझी यांनी दिला आहे. काँग्रेस, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला आहे. आता या भागातील स्थानिक ग्रामस्थ आणि जमीनमालक प्रकल्पासाठी आमची जमीन घ्या, अशी मागणी करत पुढे आले आहेत. दरम्यान बारसू, सोलगाव, राजवाडी, धोपेश्वर तसेच या भागातील ग्रामस्थांनी तसेच राजापूर शहरातील काही नागरिकांनी आपली भूमिका मांडली.