नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू
By admin | Published: March 8, 2017 02:00 PM2017-03-08T14:00:07+5:302017-03-08T14:00:07+5:30
राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका
नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू
राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी ६१ कोटी ९ लाख २७ हजार ६१६ रुपये खर्चाची सुधारित नळपाणी योजना ही पुढील २० ते २५ वर्षांतील शहराचा विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिलेल्या या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून ही योजना मार्गी लावण्यात खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यामुळेच या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. येत्या दीड वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, आरोग्य समिती सभापती स्मितल पावसकर उपस्थित होते. या योजनेचा पहिल्या टप्प्यातील १७ कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुढील निधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खासदार राऊत व राज्य शासनाच्या अंदाज समितीचे सभापती आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुुळे या योजनेतील संभाव्य अडथळे आता दूर झाले आहेत.
या योजनेतून सर्वप्रथम शीळ धरणापासून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रादरम्यानची साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलली जाणार आहे. सध्याची वाहिनी खराब झाल्याने पाणी गळतीचे, जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्या नवीन जलवाहिनीमुळे सुटेल व पाण्याची गळती थांबून रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळेल. रत्नागिरीतील साठवण टाक्या, शहरातील पाणी वितरण जलवाहिन्यांचे खराब झालेले जाळे बदलणे, नाचणे व साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, पानवल धरणाची नव्याने उभारणी, पानवल धरणापासून नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणे, यासारखी कामे या सुधारित नळपाणी योजनेत प्राधान्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)
वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेणार
टोर्इंग केलेल्या वाहनांसाठीची जागा नगर परिषदेची आहे. या जागेच्या प्रवेशद्वाराला नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार कुलुप लावण्यात आले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ही जागा टोर्इंग केलेली वाहने ठेवण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरातील वाहनधारक, व्यापारी, फेरीवाले तसेच अन्य घटकांच्याही काही समस्या आहेत. त्यामुळे लवकरच वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेऊ.