रत्नागिरीतील सर्वच निवडणुकांना महायुतीने सामोरे जाऊ - मंत्री उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: July 22, 2023 06:38 PM2023-07-22T18:38:21+5:302023-07-22T18:51:32+5:30
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली शिवसेनेची बैठक
रत्नागिरी : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातही यापुढेल प्रत्येक निवडणूक महायुतीने लढवली जाईल आणि जिल्हा परिषद, नगर परिषदांवर महायुतीलाच विजय मिळेल, असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रत्नागिरीमध्ये शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला आमदार योगेश कदम, उपनेते सदानंद चव्हाण, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राजन शेट्ये, प्रकाश साळवी, राजेश मुकादम, सुभाष कळेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, बाबू म्हाप, प्रमोद पवार, अशपाक हाजू यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत म्हणाले की, आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता सर्वच निवडणुका शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा महायुतीनेच लढवल्या जातील. त्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
तीन पक्षांमध्ये उमेदवार निवड कशी होणार, यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, एवढेच सूत्र नक्की आहे. बाकी निर्णय योग्य वेळे घेऊ.
समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात
तीनही पक्षांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात हाेईल. महायुती म्हणून कशा पद्धतीने समन्वय ठेवत पुढे जायचे आहे, ते या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. आधी ६० आणि ४० असे सूत्र वापरण्याचे ठरले होते. आता तीन पक्ष असल्याने त्यात बदल होईल आणि राज्य पातळीनुसार सूत्र निश्चित केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.