कोकणात आढळली मानवाचे अस्तित्व दाखविणारी हत्यारे, रत्नागिरीतील संशोधन केंद्रात जतन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:33 PM2023-12-05T13:33:19+5:302023-12-05T13:33:32+5:30

हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग कालखंडातील असण्याची शक्यता

Weapons found in Konkan showing human existence, preserved in research center at Ratnagiri | कोकणात आढळली मानवाचे अस्तित्व दाखविणारी हत्यारे, रत्नागिरीतील संशोधन केंद्रात जतन

कोकणात आढळली मानवाचे अस्तित्व दाखविणारी हत्यारे, रत्नागिरीतील संशोधन केंद्रात जतन

रत्नागिरी : रत्नागिरीत सुरू करण्यात आलेल्या कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्या माध्यमातून संशोधनात्मक काम सुरू आहे. या संशाेधनात्मक कामातून रत्नागिरी, राजापूर, मालवण या तालुक्यांमध्ये दगडी हत्यारे सापडली आहेत. ही हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसवी सन पूर्व ४० ते १० हजार या कालखंडातील असावीत, असा अंदाज आहे. हा मानवाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्यातर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन हा राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे. अभ्यास, संशोधन करताना सापडलेली दगडी हत्यारे ही कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहेत. तसेच, दक्षिण कोकणात कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत.

कातळशिल्प संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण आहे. या सुरू असलेल्या संशोधनात्मक कामामध्ये पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे, सुधीर रिसबूड व धनंजय मराठे यांच्यासह कातळशिल्प संशोधन प्रकल्पावर कार्यरत संशोधक दिव्यांश कुमार सिन्हा, रघुनाथ बोकिल, मधुसूदन राव, स्नेहा धबडगाव, रेणुका जोशी, तार्किक खातू यांचा समावेश आहे.

१८ ते २० लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. अनुभवानुसार त्याने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील अशी उपयुक्त हत्यारे बनवली. काळानुरूप दगडी हत्यारांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात. कोकणातील दगडी हत्यारे येथे मानवी वस्ती अंदाजे किती वर्षांपासून अस्तित्वात होती याचा पुरावा आहे.

आढळलेली हत्यारे

तासणी (Scrapers), सूक्ष्म पाती (Micro Blades), गाभे (Cores), प्रीपेड कोर (Prepared Cores), छिलके (Flakes) यांचा समावेश आहे. दगडी हत्यारांचे आकार, बनवण्याची पद्धती यावरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग या कालखंडातील असल्याचे पुढे आले आहे.

Web Title: Weapons found in Konkan showing human existence, preserved in research center at Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.