लग्नाला झाली गर्दी, पाच हजारांच्या दंडाची वर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:11+5:302021-04-27T04:32:11+5:30
लग्नसोहळ्याला गर्दी केल्याने नवरदेवाला बसला पाच हजाराचा दंड चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील एका लग्नसोहळ्यासाठी प्रशासनाने सशर्त मान्यता दिली. ...
लग्नसोहळ्याला गर्दी केल्याने नवरदेवाला बसला पाच हजाराचा दंड
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील एका लग्नसोहळ्यासाठी प्रशासनाने सशर्त मान्यता दिली. मात्र महामार्गाशेजारीच एका मंगल कार्यालयात मोठी गर्दी जमवून हे लग्नकार्य करण्यात आले. त्यामुळे खेर्डी ग्रामपंचायत व पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत ५ हजाराचा दंड ठोठावला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी नवी नियमावली लागू करताना लग्नकार्याला केवळ २५ जणांच्या उपस्थितीलाच परवानगी दिली आहे. सोमवारी खेर्डी येथील खासगी मंगल कार्यालयात तिवरे येथील मुलाचे व दापोली येथील मुलीचे लग्नकार्य होते. या लग्नकार्याला प्रशासनाची मान्यता होती. मात्र प्रत्यक्षात मंगल कार्यालयात जास्त गर्दी झाल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्या. त्यानुसार ग्रामपंचायत तसेच पोलिसांनी मंगल कार्यालयात धाव घेतली. तिथे ६० ते ७० लोक असल्याचे निदर्शनास आले. खेर्डीचे उपसरपंच विजय शिर्के व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस अधिकारी सागर चव्हाण, विनोद आंबेकर, देसाई हे मंगल कार्यालयात पोहोचले. त्यावेळी नियमापेक्षा जास्त गर्दी असल्याचे त्यांना दिसले.
पोलीस व ग्रामपंचायतचे पदाधिकारी कार्यालयात येताच गर्दी पांगली.
या प्रकरणी संबंधितांवर ग्रामपंचायतीकडून पाच हजाराचा दंड करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही दुकान सुरूच ठेवणाऱ्या एका बड्या दुकानदाराला ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. बाजारपेठेतील आणखी दोघांनी नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर प्रत्येकी १ हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.