पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लवकर सुसज्ज इमारत उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:55+5:302021-06-16T04:42:55+5:30
लांजा : येथील पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज अशी नूतन पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन ...
लांजा : येथील पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज अशी नूतन पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. गर्ग यांनी सोमवारी सायंकाळी लांजा येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रामुख्याने लांजा पोलीस वसाहत आणि रिक्त असलेल्या लांजा पोलीस निरीक्षक पदाबाबत चर्चा करण्यात आली. सध्या जिल्ह्यात दोनशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोविडमुळे सध्या पोलीस भरती रखडली आहे. या महामारीनंतर ही पदे भरली जातील, असे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून लांजा पोलीस वसाहतीची अतिशय दुरवस्था झाली आहे. मोडकळीस आलेले छप्पर दारे-खिडक्या, गळक्या इमारती अशा ठिकाणी पोलीस राहत आहेत. ही बाब पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. नवीन वसाहतीसंदर्भात प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर नवीन वसाहत बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
................
विरोध करणाऱ्यांवर गुन्हे
लांजा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे कोविड लसीकरण आणि तपासणीसाठी जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांतून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये पोलिसांच्या मदतीने लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता लोकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोना चाचणी आणि लसीकरणाला विरोध करणाऱ्यांवर यापुढे गुन्हे दाखल करणार असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.