‘इकडे आड, तिकडे विहीर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:17+5:302021-05-19T04:32:17+5:30
तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात ...
तसं पाहिलं तर कोकणी माणसामध्ये कमालीची सोशिकता आहे, त्याचबरोबर कमालीचा स्वाभिमानही. घरात खायला नसले, तरी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन हात पसरणे, ही त्याची वृत्तीच नाही. स्वत:कडचे देईल; पण दुसऱ्याकडचे घ्यायला त्याला तेवढाच कमीपणा वाटतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांत कोकणी माणसाच्या संकटात सातत्याने भर पडत आहे. मात्र, तेवढे आघात पेलूनही त्या संकटांचा सामना करण्याचे बळ निर्माण करण्यासाठी तो कसोशीने धडपड करीत आहे. त्यातून पुन्हा नव्या दमाने उभारी घेत आहे, हे कोकणी माणसाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षातही त्याची संकटाने पाठ सोडलेली नाही. २०२१ हे वर्ष उजाडल्यानंतर कोरोनाचे संकट नष्ट होईल, असे वाटत होते. त्यामुळे या वर्षाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा सुरू होती. हे वर्ष आले; मात्र, कोरोनाला मागे टाकून येण्याऐवजी ते कोरोनाला पुन्हा सोबत घेऊन आले. त्यामुळे हे वर्षही गेल्या वर्षाचीच पुनरावृत्ती ठरली. उलट हे वर्ष अधिकच विध्वंसक ठरले. या वर्षात कोरोनाने माणसांचा संहारच करायचा जणू पण केला आहे. अनेक कुटुंबे बाधित झाली. अनेक जवळचे आप्त जाताना बघून कुणाकुणाचे दु:ख करायचे आणि कुणाला सावरायचे, हेच काही कळेनासे झाले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा नंगानाच सुरूच आहे. रुग्णांच्या संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृत्यूची संख्याही आता हजाराच्या वाटेवर आहे. त्यातच आता ताैक्ते संकटाने दोन दिवस जिल्ह्यात धुमाकूळ माजवला होता. गेल्यावर्षीच्या निसर्ग वादळाच्या आठवणी ताज्या असतानाच, या चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली. पण ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे कोकणी माणूस संकटाने भयभीत झाला, तरीही तो हातपाय गाळून न घेता, त्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी करतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचीही कोकणावरील नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात वादळे, अतिवृष्टी, दरड कोसळणे, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती आता ठायी ठायी समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या वर्ष- दीड वर्षात कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती पाठोपाठ येत आहेत. मात्र, खचून न जाता काेकणी माणूस पुन्हा नव्या दमाने उभा रहात आहे. म्हणूनच असंख्य संकटे त्याचा पाठलाग करूनही त्यातून बाहेर पडण्यात तो यशस्वी होतोय. हे आत्मबल त्याला कुठून मिळते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.