विहिरींतील गाळ उपसा रखडलेलाच
By admin | Published: November 20, 2014 10:53 PM2014-11-20T22:53:23+5:302014-11-21T00:32:39+5:30
विपरित परिणाम : खेडमध्ये ९७ विहिरी
खेड : जिल्ह्यातील विहिरींतील गाळ उपसा गेली अनेक वर्षे रखडला आहे. यामुळे विहिरीतील पाण्याचे झरे बंद झाले आहेत. याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत आहे़ खेड तालुक्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. खेड तालुक्यातील जवळपास ९७ विहिरीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याकरिता आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम हाती घेण्यात येणार आहे.
हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, शेकडो मजुरांना काम मिळणार आहे. गाळ उपसा झाल्याने या विहिरीत पाणी साठण्याचे प्रमाण वाढणार आहे़ यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे़
जिल्ह्यातील सुमारे १०४२ विहिरी गाळाने भरल्या आहेत़ यामध्ये खेड तालुक्यातील ९७ विहिरींचा सामावेश आहे. गाळ उपसा करण्याच्या कामाकरिता जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे. तर खेड तालुक्यात शेकडो मजुरांना काम मिळणार आहे़ हे काम अंगमेहनतीचे आहे़ मात्र, अनेक कुटुंबांना वर्षातील १०० दिवस रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात सिंचन विहिरींचा फायदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होतो़
मात्र, सर्वच विहिरींतील गाळ गेली अनेक वर्षे काढला नसल्याने विहिरीत पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम पाणी या विहिरीत असते. त्यानंतर सर्व विहिरी कोरड्या पडतात. गाळ न काढल्याने अनेक विहिरीतील पाण्याचे जुने झरे बंद झाले आहेत. कालांतराने या विहिरीच गाळाने भरून त्या बुजल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात याचा या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही. गाळ उपसा केल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अशा विहिरींमधून गाळ काढला जावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
कायमस्वरूपी उपाय आवश्यक