‘आम्ही कोरोनाला हरवणारच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:59+5:302021-04-12T04:28:59+5:30
टेंभ्ये / सागर पाटील रत्नागिरी शहराच्या उपनगरांमध्ये दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन शंभर टक्के पाळण्यात आला. परिसरात कडकडीत ...
टेंभ्ये / सागर पाटील
रत्नागिरी शहराच्या उपनगरांमध्ये दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन शंभर टक्के पाळण्यात आला. परिसरात कडकडीत बंद पहायला मिळला. विशेष बाब म्हणजे जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणारी अनेक किराणामाल स्टोअर्स व भाजीपाला सेंटरही बंद करण्यात आली होती. ‘आम्ही कोरोनाेला हरवणारच’ या जिद्दीने या उपनगरांमधील जनतेने या वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या निर्णयाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला होता. रत्नागिरी शहराच्या कुवारबाव, साळवी स्टॉप, कोकणनगर, नाचणे, शांतीनगर व अभ्युदयनगर यांसारख्या उपनगरांमध्ये या लॉकडाऊनमध्ये कडकडीत बंद पाळला हाेता. कुवारबाव परिसरात सकाळी सातपासून ते रात्री दहापर्यंत नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. परंतु, लॉकडाऊनमध्ये या परिसरामध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. कुवारबाव परिसरातील तुरळक किराणामालाची दुकाने, भाजीपाला स्टॉल व मेडिकल स्टोअरवगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे या परिसरातील मटन व चिकन शॉपही रविवारी बंद ठेवण्यात आली हाेती. एमआयडीसी परिसरामध्ये पूर्णतः शुकशुकाट पहायला मिळत होता. साळवी स्टॉपच्या भागामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी दुकाने सुरू हाेती. अभ्युदयनगर व शांतीनगर परिसरातील काही किराणामालाची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भागात शुकशुकाट पसरला हाेता.