पाश्चात्त्यांनी कौतुक केल्यावर वाढतंय योगाचे
By Admin | Published: June 21, 2016 12:47 AM2016-06-21T00:47:39+5:302016-06-21T01:18:54+5:30
महत्त्व...!--योगदिन विशेष
मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
योग ही व्याधीमुक्त जीवनाची पहिली पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. योगाची व्याप्ती, महत्व इतके मोठे आहे की, शब्दश: त्याची व्याख्या करणे शक्य नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किंबहुना तणावपूर्ण जीवनाचा योग अविभाज्य भाग बनला आहे. जगाला योगाचे महत्व पटले आहे. त्यामुळे जगभरातून योग शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वास्तविक योग हा भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आहे. मात्र आता पाश्चात्त्य देशांनी योगाचा स्वीकार केल्यानंतर त्याची भारतातील महती वाढू लागली आहे, अशी खंत या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मनात आहे.
पाश्चात्य देशांना, तेथील नागरिकांना योग, प्राणायाम या विज्ञानानिष्ठीत ज्ञानाची माहिती पटली आहे. त्याचे फायदे कळल्यामुळे योगाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे अनुकरण पाश्चात्यांनी केल्यावर आपण त्याकडे आकर्षित झालो आहोत. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून, यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६५ दिवसांपैकी एक दिवस योगाला विशेष महत्व देण्यापेक्षा उर्वरित ३६४ दिवसांमधील काही मिनिटे अथवा तास हे योगासनासाठी देणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात आपण आजारापासून स्वत:ला दूर ठेवू शकू. तसेच यामुळे जिवनाचा खराखुरा आनंदही अनुभवता येईल.
शासनाने देखील योगासनाला विशेष प्राध्यान्य देत शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना योगासाठी प्रवृत्त केले आहे. मात्र, काही शाळांमध्ये आधीपासूनच योगासने शिकविली जात आहेत. काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आॅलिंपियाडसारख्या स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले आहे. जिल्ह््याच्या रत्नकन्या पूर्वा व प्राप्ती किनरे, अवंती काळे या विद्यार्थिनींनी देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन रत्नागिरीचे नाव उंचावले आहे.