‘व्हेल’च्या उलटीची तस्करी करणारा गजाआड, पाच कोटींचा मुद्देमाल केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:08 PM2021-07-08T12:08:42+5:302021-07-08T12:09:12+5:30
याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून यात आणखी काही जण आहेत का याचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांनांकडून सांगण्यात आले.
माणगाव : माणगाव-रत्नागिरी येथून दुचाकीवरून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या व्यक्तीस रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लोणेरे येथे अटक केली. त्याच्याकडून पाच कोटींचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजता मुंबई-गोवा महामार्गापासून २०० मीटर अंतरावर मौजे लोणेरे गोरेगाव जाणाऱ्या रोडवर आरेापी अब्दुल मुतालीब महम्मद जाफर सुर्वे (४५) हा दुचाकीवरून व्हेल माशाच्या उलटीच्या लहान मोठ्या आकाराचे तुकडे बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी व पाच कोटी रूपये किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीचे लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण पाच कोटी ५० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून यात आणखी काही जण आहेत का याचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांनांकडून सांगण्यात आले. नेमकी हा कुठे, कशासाठी घेऊन दात होता हे चौकशीतून उघड होईल असे पोलीस म्हणाले.