कंपन्यांना परवाने देताना सुरक्षिततेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:44+5:302021-04-30T04:40:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका ...

What about security when licensing companies? | कंपन्यांना परवाने देताना सुरक्षिततेचे काय?

कंपन्यांना परवाने देताना सुरक्षिततेचे काय?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत एकामागोमाग एक स्फाेट होण्याचे प्रकार सुरू असून, ही मालिका आणखी किती जणांचे बळी घेऊन थांबणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपन्यांना उत्पादनाचे परवाने देताना खरोखरच सुरक्षिततेची पाहणी होते का? हा प्रश्न निरुत्तरित राहिला आहे.

मागील चार महिन्यात लोटे औद्योगिक वसाहतीत जवळपास सात अपघात घडले. एका वायुगळतीचा प्रकार वगळता सहा अपघात हे स्फोट व आग लागून झाले आहेत. प्रथम येथील दुर्गा केमिकल ही कंपनी जानेवारी महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्मसात झाली. यावेळीही कंपनीत एकापाठोपाठ एक स्फोट होत असताना कामगारांसह नागरिकांसमोर मृत्यूच उभा राहिला होता. त्यानंतर येथील लासा सुपर जेनेरिक कंपनीच्या डेरापेंट या युनीटमधील घनकचऱ्याला आग लागली. श्री पुष्कर कंपनीत वायुगळतीची घटना घडून जवळच असणारी लोटेतील नागरी वस्ती गुदमरून गेली. पाठोपाठ १५ मार्चला येथील सुप्रिया कंपनीत आग लागून दोन कामगार भाजले गेले तर २० मार्च रोजी घरडा केमिकलमध्ये स्फोट होऊन आग लागली. यात पाच कामगारांचा बळी गेला. या घटनेला महिना होतो ना होतो तोच १८ एप्रिल रोजी समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत स्फोट होऊन तिघांचा जागीच मृत्यू तर दोघांनी उपचार घेताना प्राण सोडला. या अपघाताच्या दहाव्या दिवशी म्हणजे दि.२८ रोजी येथील एमआर स्पेशालिटी केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली.

यातील घरडा व सुप्रिया केमिकल कंपनीत स्वत:ची आगप्रतिरोधक सुरक्षा यंत्रणा असल्याने परिसरातील रहिवाशांपर्यंत याची तीव्रता जाणवली नाही. मात्र यातील लासा सुपरजेनेरिक, श्री पुष्कर केमिकल, दुर्गा केमिकल, समर्थ इंजिनीअरिंग व एमआर स्पेशालिटी याचा विचार संपूर्णपणे बाहेरील अग्निशमन यंत्रणांवरच अवलंबून राहावे लागले. मात्र या आगींवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलांना अग्निपरीक्षेलाच सामोरे जाण्याची परिस्थिती दिसली. समर्थ इंजिनीअरिंगमध्ये प्रत्यक्ष आगीच्या मुळाशी जाण्यास कंपनीत अस्ताव्यस्त पडलेले रासायनिक ड्रम अडथळा ठरल्याने तेथे अडकलेल्या कामगारांचे जीव वाचवण्यात अपयश आले. असेच चित्र एमआर कंपनीत दिसले. कंपनीच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण प्लांटभोवती रासायनिक ड्रमांचा खच पडला होता. यामुळे अग्निशमन दलाचे वाहन कंपनीबाहेर रस्त्यावर उभे करून अग्निशमन दलाचे कर्मचारी नियंत्रण मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. त्यामुळे या कंपन्यांना उत्पादनात परवानगी देताना शासनाचे सुरक्षा विभाग नेमकी कशाची पाहणी करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परवानगी केवळ कागदोपत्रीच दिल्या जातात का, असाही प्रश्न आहे. कारण एमआर कंपनीत उभारण्यात आलेली आगप्रतिबंधक यंत्रणा मृतावस्थेत होती. मग अशा कंपन्यांना परवाना मिळताेच कसा? असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: What about security when licensing companies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.