तीन दिवस वाट पाहिल्यानंतर रत्नागिरीकरांना मिळणार आनंदाची माहिती- काय काय मिळणार सवलती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:06 PM2020-04-17T13:06:57+5:302020-04-17T13:09:36+5:30
जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : कोरोनाला अटकाव करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. २० एप्रिलनंतर यात शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, शिथिलता देताना कठोर नियमावली लागू आहे. २०एप्रिल नंतर शासकीय कामे, काही उद्योग, पावसापूर्वी कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, महामार्गाचे काम, चिरेखाणी, मिठाई दुकाने सुरू होणार आहे. मात्र, त्या-त्या ठिकाणच्या कामगारांच्या माध्यमातून ही कामे केले जाणार आहेत. कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
२२ मार्च ते १४ मार्च अशी २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. उद्योग, व्यवसाय, व्यापार, वाहतूक आदी जिथल्या तिथे थांबले. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून देश, कामगार वर्ग उद्योग, व्यवसाय सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व अभ्यास करून जिल्हाअंतर्गत २० तारखेपासून शिथिलता आणली जाणार आहे.
जिल्ह्यातील काही उद्योग सर्व अटी-शर्ती घालून सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कामे, पावसापूवीर्ची कामे, नरेगा, अत्यावश्यक वाहतूक, खासगी दवाखाने, मुुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम, चिरेखानी, मिठाई, फरसाण दुकान, मॅन्युफॅक्चीरिंग आदी सुरू केले जाणार आहे. जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काहीशी शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.