आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे : बापू लिंगावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:41+5:302021-05-05T04:52:41+5:30

दापोली : लस उपलब्ध करून देण्यासाठी व लोकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता जालगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला होता; परंतु लस ...

What should we answer to the people: Bapu Lingavale | आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे : बापू लिंगावळे

आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे : बापू लिंगावळे

Next

दापोली : लस उपलब्ध करून देण्यासाठी व लोकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता जालगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला होता; परंतु लस उपलब्ध होत नसल्याने आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा संतप्त प्रश्न जालगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापू लिंगावळे यांनी केला आहे.

जालगाव ग्रामपंचायतीने ४५ वर्षांवरील लोकांकडून लसीचे नोंदणी अर्ज भरून घेतले होते. दापोली तालुक्यात लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशा लोकांची मुदत संपूनही दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तरीही दुसरा डोस उपलब्ध होत नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बापू लिंगावळे यांनी केली आहे.

दापोली तालुक्याला डोस उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत असून, इतर तालुक्यांच्या तुलनेत दापोली तालुक्याबाबत दुजाभाव केला जात आहे. अनेक जण लसीकरण केंद्राचे उंबरठे झिजवून थकले आहेत, तर काही ठिकाणी मात्र सकाळी ५ वाजेपासून लांबच लांब रांगा लावून लोक अक्षरशः कंटाळले आहेत. या गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार होतोय की काय, अशी भीतीसुद्धा अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे; परंतु सर्वच लसीकरण केंद्रांवर नियोजनशून्य भोंगळ कारभार पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रावर लोकांची मोठी गैरसाेय हाेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जालगाव ग्रामपंचायतीने लोकांना लस मिळण्याकरता नावनोंदणी अर्ज भरून घेतले आहेत; परंतु लस उपलब्ध होत नसल्याने लोक वारंवार आम्हाला लस कधी मिळणार, अशी विचारणा करत आहेत. त्यामुळे लोकांना आम्ही काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न बापू लिंगावळे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: What should we answer to the people: Bapu Lingavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.