अर्धवट, घुसमटलेली कामे हा विकासाचा कोणता टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:51+5:302021-03-31T04:32:51+5:30
रत्नागिरी : शहरातील उखडलेले रस्ते, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, बसस्थानकाचे ठप्प पडलेले काम, पाणी योजना मुदत ...
रत्नागिरी : शहरातील उखडलेले रस्ते, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, बसस्थानकाचे ठप्प पडलेले काम, पाणी योजना मुदत वाढीत घुसमटली असून रत्नागिरी शहराच्या विकासाचा हा नेमका कोणता टप्पा असल्याची कडवट प्रतिक्रिया भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी शहरातील रस्ते उखडून तीन महिने झाले. धुळीचे साम्राज्य सर्वत्र असून रस्त्यावरून चालताही येत नाही, रस्त्यात मोकाट जनावरांचा संचार ही रत्नागिरीनगराची ओळख झाली आहे. चार वर्षे लोटली तरी पाणी योजना मुदतवाढीच्या गर्तेत अडकली आहे. नागरिक मात्र पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. मुदतवाढ, त्यातून रक्कमवाढ या दुष्टचक्रात रत्नागिरीची पाणी योजना फसली असून नेमकी पूर्तता कधी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी एस. टी. बसस्थानक हे आणखी एक विकासाचे उदाहरण आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादी जुनी पडीक वास्तू असावी, तशी या बसस्थानकाची अवस्था झाली आहे. शहराला विद्रूप स्वरूपात पुढे आणण्याचा खटाटोप सुरू असावा, असे चित्र निर्माण झाले आहे. गेले कित्येक महिने हे काम पुढे सरकत नाही. बसस्थानकाच्या या कामामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, प्रवाशांची गैरसोय याकडे सत्ताधीशांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
शहरातील मराठी शाळा या एक-एक करून इतिहास जमा होत आहेत. लोकमान्य टिळकांची शाळा, तिची दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. तिथे परत शाळा होणार? की लोकमान्य टिळकांची शाळा म्हणून प्रसिद्ध ही शाळा आता केवळ इतिहास जमा होणार? आगाशे कन्या शाळा बंद झाली. अशा काही शाळा बंद होत आहेत. या शाळाबद्दल नेमकी भूमिका काय, भविष्यातील नियोजन काय, याबाबत नेमकी उदासीनता कशासाठी, असे प्रश्न त्यांनी केले आहेत. जनतेने सातत्याने विश्वास ठेवत सत्ताधीशांना निवडून दिले. मात्र, रत्नागिरीतील प्रश्नांबाबत नेमके काय सुरू आहे? उखडलेले रस्ते, प्रलंबित पाणी योजना, बंद पडत चाललेल्या शाळा, ठप्प पडलेले एस.टी. बसस्थानकाचे काम हा विकासाचा कोणता टप्पा आहे? हेच समजत नसल्याची बोचरी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.