राज्य देणार नाही ते केंद्र सरकार देईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:32 AM2021-08-26T04:32:57+5:302021-08-26T04:32:57+5:30
चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी ...
चिपळूण : पूर परिस्थितीचा अंदाज आपण स्वतःहून घेतला असून, ती भयावह परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने मदत करायला हवी होती. मात्र, ती का केली नाही, याचा जाब ठाकरे सरकारला नक्कीच विचारला जाईल. मात्र, राज्य सरकारने जे दिले नाही, ते केंद्र सरकार देईल. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे व्यापाऱ्यांना दिले.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांचे चिपळूण व्यापारी महासंघ, लोटे येथील उद्योजक संघटना, खेर्डी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व अन्य पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राणे म्हणाले की, केंद्रात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले आहे. कोकणवासीयांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच आतापर्यंतची पदे मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग खात्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली असून, या खात्याच्या आधारे कोकणी माणसाला प्रगतीकडे व उद्योजकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न करेन.
कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून रोजगाराच्या माध्यमातून कोकणचे दरडोई उत्पन्न व विकास दर वाढवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. गेल्या सात वर्षात केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या. देशातील नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे, यासाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली. त्यातून आज देशातील ८० कोटी नागरिकांना लाभ होत आहे. शासनाच्या या योजनांच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा काढल्याचेही राणे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा होती. ती झालेली नाही. मात्र, केंद्र सरकार ती कसर भरून काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले.