अशा लाॅकडाऊनचा उपयोग तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:10+5:302021-05-20T04:34:10+5:30
रत्नागिरी :कोरोनाची साखळी तुटण्यासाठी शासनाने १ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, किंवा अजिबातच ...
रत्नागिरी :कोरोनाची साखळी तुटण्यासाठी शासनाने १ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना होम आयसोलशेनमध्ये ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या घरांमध्ये किंवा फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही, अशा ठिकाणी रुग्णाच्या संसगार्मुळे घरातील बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर लॉकडाऊन असले तरी घरात रहाणाऱ्या रुग्णांमुळेच कोरोना संसर्ग वाढत आहे.
सध्या होम आयसोलशेनमध्ये असणाऱ्यांची संख्या जवळपास बाराशेपर्यंत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसली अथवा सौम्य लक्षणे असली तरी हे रुग्ण आपल्या संपर्कातील ३० व्यक्तींना बाधित करू शकतात. शासकीय रुग्णालयांमधील बेडची अपुरी असलेली क्षमता लक्षात घेऊन शासनाने ही नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयांवरील ताण कमी होऊन घरी आयसोलेशनमध्ये रहाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
स्वतंत्र संडास बाथरूमची सोय असलेली वेगळी खोली असणाऱ्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा घरांमध्ये किंवा वन रूम किचनमध्ये रहाणाऱ्या फ्लॅटमध्ये अशा रुग्णांना अलगीकरणात ठेवणे अशक्य आहे. मात्र, शासनाच्या नियमामुळे आता सरसकट रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग खंडित न होता घरातील माणसांमध्ये अधिकच वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने घरातील लहान मुले, वृद्ध यांच्याबरोबरच आजुबाजूच्या लोकांमध्ये हा प्रभाव अधिक वाढत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यापेक्षा वाढत आहे.
शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात आता १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरू आहेत. दूध हे काही किराणा दुकानातही मिळत आहे. त्यामुळे या वेळेत किराणांची खरेदीही सुरू आहे. काही दुकानदार शटर अर्ध्यावर पाडून माल विकत आहेत. त्यामुळे या वेळेत असलेली वर्दळ पाहाता, कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढतच आहे.
सध्या बाहेर फिरणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करून सर्व उद्योग - व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे आर्थिक गणिते विस्कळीत झाली आहे. परंतु कोरोना साखळी तुटण्यासाठी जी महत्त्वाची कारणे आहेत, त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला तसेच प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन केवळ नावापुरतेच ठरत आहे.
कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी पूर्णपणे लाॅकडाऊन झाले असते तरच कोरोना साखळी तुटण्यास मदत झाली असती. तसेच ज्या घरांमध्ये अलगीकरण करण्यासाठीच्या सुविधा नाहीत, अशा रुग्णांना घरी न ठेवता त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.