लेकीच्या यशाचे वृत्त कळताच डोळ्यात आनंदाश्रू तरळले!

By admin | Published: April 19, 2016 10:54 PM2016-04-19T22:54:32+5:302016-04-20T01:18:13+5:30

यशवंत सावंत : सुवर्णकन्या ऐश्वर्या सावंतचे वडील भावूक, दोन दिवस मजुरीचे काम बंद ठेवून अनुभवले लेकीचे कौतुक

When the news of Leki's success was tears of joy in the eye! | लेकीच्या यशाचे वृत्त कळताच डोळ्यात आनंदाश्रू तरळले!

लेकीच्या यशाचे वृत्त कळताच डोळ्यात आनंदाश्रू तरळले!

Next

मेहरून नाकाडे--  रत्नागिरी  -आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देऊन अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाविरूध्द तीन मिनिटांची एंट्री टाकून ऐश्वर्याने प्रतिस्पर्धी संघाची दमछाक केली. ऐश्वर्याच्या यशाचे वृत्त कळताच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सध्या ऐश्वर्याची आई व बाबा अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणारे तिचे वडील यशवंत शांताराम सावंत यांनी ‘माझ्या लेकीने कष्टाचे सार्थक केले’, या शब्दात ‘लोकमत’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
ऐश्वर्याने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेंतर्गत बारावीची परीक्षा दिली आहे. खो - खो क्रीडा प्रकारात शालेयस्तरापासून ऐश्वर्याने सातत्याने यश संपादन केले आहे. ऐश्वर्याने गेल्या पाच वर्षात विविध दहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय १९ वर्षांखालील शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले. केरळातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, सिनियर राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत दोन सुवर्णपदके, एक रौप्य, पायका क्रीडा स्पर्धेत एक सुवर्णपदक मिळवले आहे. भारताचा खो-खो स्पर्धेत दिला जाणारा मानाचा ‘जानकी’ पुरस्कारही ऐश्वर्याने मिळवला आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ऐश्वर्या नववीत असताना तिची आई गेली. त्यामुळे वडिलांची जबाबदारी पार पाडत असतानाच नवीन जबाबदारी येऊन पडली. गेल्या ४० वर्षांपासून उद्यमनगर येथील कुष्ठरोग वसाहतीत राहात आहोत. २० वर्षे बांधकाम व्यावसायिकांकडे मजुरीवर काम करीत आहे. कामाच्या दिवसांवर मिळणाऱ्या मजुरीतून घरखर्च चालतो. ऐश्वर्याची मोठी बहीण प्रिया हिने घरची जबाबदारी घेतली आहे. घरातील सर्व आटोपून ती एका डॉक्टरांकडे नोकरी करते. ऐश्वर्याची खेळाची आवड व तिने मिळवलेले यश यामुळे आम्ही तिला सातत्याने प्रोत्साहीत केले. या यशात तिचे मार्गदर्शक पंकज चवंडे, विनोद मयेकर, जिल्हा खो - खो संघटनेचे सचिव संदीप तावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विश्वासावरच मुलीला विविध स्पर्धांसाठी पाठवत आहे. ऐश्वर्या घरी असली तरी तिचे दैनंदिन वेळापत्रक ठरलेले असते.गेल्या दोन दिवसांपासून ऐश्वर्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, यांच्यासह कित्येक दिग्गज मंडळी आमच्या घरी आली. त्यामुळे ऊर भरून येतो. ऐश्वर्यामुळे का होईना कुष्ठरोग वसाहतीचे प्रलंबित प्रश्न, समस्या सुटण्यास मदत होणार आहे.पहाटेपासून ऐश्वर्याचा दिनक्रम सुरू होतो. पहाटे पाच वाजता ती सरावासाठी मैदानावर हजर असते. सरावानंतर अभ्यास व पुन्हा सराव असा तिचा दिनक्रम असतो. भविष्यात खेळ सुरू ठेवण्यासाठी माझा व बहीण म्हणून माझ्या मोठ्या लेकीचा तिला पाठिंबा असेल. उत्तरोत्तर तिने असेच यश मिळवत राहावे, किंबहुना तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तुटपूंज्या कमाईमुळे स्पर्धेकरिता परजिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी लागणारा खर्चही उभा करणे शक्य होत नाही. मात्र, प्रशाला, संस्था व मार्गदर्शक वेळोवेळी सहकार्य करतात, असे त्यांनी सांगितले.

तिच्याबरोबर सत्कार सोहळ्याला जाते, तेव्हा आईची खूप खूप आठवण येते. आनंदाबरोबर अश्रूंनाही वाट मोकळी करून देते. ऐश्वर्याचे यश पाहण्यासाठी आज आई हवी होती, असे सातत्याने वाटते. बाबा आमची काळजी घेतात. परंतु ऐश्वर्या जेव्हा स्पर्धेला बाहेर जाते, तेव्हा बाबा व मी दोघेच असतो. ऐश्वर्या घरी येईपर्यंत डोळे लावून तिची वाट पाहात असतो. स्पर्धा जिंकून येईल, याची खात्री हमखास असते. घरी आल्यानंतर ती स्पर्धेचे, आलेल्या अनुभवाचे, आपण कसा खेळ केला, याचे भरभरून वर्णन करीत असते. ऐकून फारच बरे वाटते. आई, बहीण, मैत्रिण म्हणून तिच्याबरोबर गप्पा मारते तेव्हा खूपच गलबलल्यासारखे वाटते. मोठी बहीण म्हणून मला तिचा अभिमान वाटतो.
- प्रिया सावंत, ऐश्वर्याची बहीण

गेले दोन दिवस विविध संस्थांतर्फे ऐश्वर्याचा सत्कार करण्यात येत आहे. ऐश्वर्याबरोबर पिता म्हणून मलाही बोलावण्यात येते. मजुरी बुडवून दोन दिवस तिच्याबरोबर फिरतोय. लेकीला सत्कार घेताना बघून ऊर भरून येतो. हा आनंद एवढा मोठा आहे की, दोन दिवसांची मजुरी बुडाल्याची खंत नाही.
- यशवंत सावंत

Web Title: When the news of Leki's success was tears of joy in the eye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.