भात पिकांची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी : मनोज गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:52+5:302021-06-20T04:21:52+5:30
अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत. ...
अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत.
भात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अभाव हे होय. एकात्मिक पीक व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. भात पिकाची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले आहे. चिखलणी, एकात्मिक व्यवस्थापन आणि लावणी पुनर्लागवड अशा क्रमाने तांत्रिक व आधुनिक पद्धत वापरून लावणी केल्यास भात पिकाचे चांगले भरघोस उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले़
शेतकऱ्यांना माहिती देताना मनाेज गांधी यांनी सांगितले की, भात पिकाच्या मशागतीत चांगली चिखलणी करणे फार महत्त्वाचे असते. चिखलणीमुळे शेतात पाणी साचून राहण्यायोग्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे तणाचा नाश होतो. दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. उभी-आडवी चिखलणी करून फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागांत समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्व मशागतीची कामे वेळेवर आधुनिक यंत्राने करावीत.
तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले उत्पादन येण्यासाठी भात पिकास आवश्यक ती सर्व अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत. मुख्य अन्नद्रव्यात नत्र स्फुरद व पालाश याचा समावेश होतो. नत्र या अन्नद्रव्यामुळे भात पिकाची वाढ जोमदार होते. स्फुरद या अन्नद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला येतो. पालाश या पोषक अन्नद्रव्यामुळे कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते.
रासायनिक व जैविक खताचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे
रोपांची पुनर्लागवड करताना सर्वसाधारणपणे हळव्या जातीची लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी करावी. निमगरव्या या जातीची लागवड २३ ते २७ दिवसांनी करावी आणि गरव्या जातीची लागवड २५ ते ३० दिवसांनी करावी. भात रोपांची पुनर्लागवड भात शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धती म्हणजे चारसूत्री भातलागवड आहे़
भात शेती करताना चार सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे. चार सूत्री लावणी भात तंत्रज्ञान वापरून भात शेती केल्यास उत्पादनाचा चांगला उतार पडतो. ही पद्धत सोपी शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम हाेते, असे मनोज गांधी यांनी सांगितले़