केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त पदे कधी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:49+5:302021-07-16T04:22:49+5:30

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणारी केंद्रप्रमुखांची निम्मी म्हणजेच १२२ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. ही पदे शासनाच्या ...

When will 50 per cent vacancies be filled? | केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त पदे कधी भरणार

केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त पदे कधी भरणार

Next

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणारी केंद्रप्रमुखांची निम्मी म्हणजेच १२२ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. ही पदे शासनाच्या दुर्लक्षतेमुळे भरण्यात आलेली नाही. बदलत्या परिस्थितीत शिक्षण विभागाच्या कामांचा पसारा वाढत असल्याने त्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर केंद्रप्रमुखांची पदे भरावीत, अशी जोरदार मागणी सुरू आहे.

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची २५१ पदे मंजूर आहेत. यापैकी प्रत्यक्षात १२९ पदे कार्यरत असून, १२२ पदे रिक्त आहेत. सुमारे ५० टक्के पदे म्हणजेचे निम्म्या जागा रिक्त असल्याने प्रभारी केंद्रप्रमुखांची जबाबदारी प्रत्येकावर सोपविण्यात आलेली आहे. परिणामी त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. या सर्व बाबींचे पर्यवेक्षण करण्यासाठी केंद्रप्रमुख महत्त्वाचा घटक आहे.

पूर्वी केंद्रप्रमुखांची १०० टक्के पदे शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येत होती. २०१० च्या निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ४० टक्के पदे सरळसेवेने, ३० टक्के पदाेन्नतीने आणि ३० टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचे आदेश होते. त्यामध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील १० जून २०१४ च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. मात्र, केंद्रप्रमुखांची सरळसेवेची व विभागीय परीक्षेद्वारे पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा ग्रामविकास विभागाने केंद्रप्रमुखाची पदे तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्यांकरिता व पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुढील ११ महिन्यांकरिता नेमणूक देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ६ वर्षांपूर्वी मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांमधून ११ महिन्यांसाठी नेमणुका देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजूनही केंद्रप्रमुखांची भरती झालेली नाही. ही भरती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शासनाशी लढत आहे.

------------

आतापर्यंत केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीने नेमणुका देण्यात आलेल्या होत्या. सरळ सेवा परीक्षा किंवा विभागीय परीक्षा झालेल्या नाहीत. रिक्त पदे असल्याने काही केंद्रप्रमुखांकडे प्रभारी म्हणून इतर केंद्रांचा पदभार देण्यात आलेला आहे. केंद्रप्रमुख भरती किंवा पदोन्नतीने पदे भरण्याचा कोणतेही आदेश आलेले नाहीत.

- नीशादेवी वाघमोडे,

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

--------------------

केंद्रप्रमुखांची आणखी किती वर्षे पदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत. रिक्त पदांमुळे इतर केंद्राप्रमुखांवर त्याचा भार पडत आहे. त्यामुळे केंद्रप्रमुखांची पदे शिक्षकांमधून अभावितपणे भरावी. त्यानंतर शासनाकडून भरतीचे आदेश आल्यानंतर पुन्हा आपल्या पदावर जाण्यास तयार आहेत.

- दीपक नागवेकर,

जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी.

-----------------------

केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांच्या भरतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहेत. सरळ सेवेची व विभागीय परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी ही पदे शिक्षकांमधून भरण्यात यावीत. त्यासाठी बी.एड्‌. झालेल्या कॅपेबल शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी ज्येष्ठतेप्रमाणे संधी द्यायला हवी.

- दिलीप देवळेकर

अध्यक्ष,

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी.

Web Title: When will 50 per cent vacancies be filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.