अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:30+5:302021-08-26T04:33:30+5:30

तुटपुंज्या मानधनावर दिवसातून ८ ते ९ तास काम करूनसुध्दा त्यांच्या कामाचा विचार करता अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मेहनतीप्रमाणे ...

When will the problem of Anganwadi workers be solved? | अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कधी सुटणार?

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कधी सुटणार?

Next

तुटपुंज्या मानधनावर दिवसातून ८ ते ९ तास काम करूनसुध्दा त्यांच्या कामाचा विचार करता अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मेहनतीप्रमाणे मानधन मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वाली कोण, असा प्रश्न सतावत असून, त्या हलाखीचे जीवन जगत आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दोन हजारांपेक्षा जास्त संख्या आहे; परंतु प्रशासनाकडून त्यांना कुठलीही सुविधा देत नसून, उलट आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदींच्या कामामध्ये हातभार लावणे यासह इतर विभागांचा भारसुध्दा त्यांच्यावर येत आहे. एवढे करूनही अंगणवाडीबाबत लाभार्थींना विविध याेजनांची माहिती देणे, लाभार्थींना घरोघरी जाऊन पोषण आहार वाटप करणे, गर्भवती महिलांसाठी पोषण आहारापासून बेबी किट ते लस देण्यापर्यंत पाठपुरावा करणे, कुपोषित बालकांसाठी योग्य व सकस पूरक आहार, औषधोपचार करणे, पोषण आहारासंबंधी अंडी वगैरे केव्हा तरी स्वत: विकत घेऊन ते लाभार्थींना वाटप करणे, यात त्यांना वर्षभर बिलांची वाट पाहावी लागते. कडधान्यरूपी आलेला पोषण आहार हा ठेकेदारामार्फत येत असल्याने त्याची हमाली त्यांना अनेकदा करावी लागते, अशी अनेक कामे त्यांना स्वत:च करावी लागत आहेत. सुमारे १४ ते १५ कामांचा यामध्ये समावेश आहे.

कागदोपत्री रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. लाभार्थींना दिलेल्या पोषण आहारासंबंधी रजिस्टरला नोंद करणे, त्यांचे मोबाइल नंबरपासून घरी जाऊन पोषण आहार देण्याइतपत त्यांना कामे करावी लागत आहेत. एवढे करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कुटुंब चालवणे दुरापास्त झालेले आहे. मिळणारे मानधनही अत्यल्प असल्याने त्यांना नेहमीच आर्थिक चणचण भासत असते. त्यांना शासनाकडून नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याची ओरड त्यांच्याकडून सुरू असते. त्यांच्या निवृत्तीचे वय इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असून, ते ६५ असले तरी एवढी वर्षे सेवा करूनही त्यांना शेवटी कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही. त्यांचे निवृत्तीनंतर जीवन सुख-समाधानाने घालवता यावे, यासाठी पेन्शनही लागू होत नाही. त्यामुळे त्यांच्या नशिबी कायम दारिद्र्यच आहे. त्यांनी केलेल्या कामाची हीच पोचपावती का? संपूर्ण आयुष्य सेवा करण्यात घालवलेले असतानाही त्यांच्या पदरी निवृत्तीनंतरही निराशाच आहे. त्यासाठी शासनाने त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

सर्वच अंगणवाडी सेविका या उच्चशिक्षित नाहीत. तरीही पोषण आहाराचे ॲपवर भरली जाणारी माहिती इंग्रजीमधूनच भरावी लागत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्याही हैराण झाल्या आहेत. त्यातच देण्यात आलेले मोबाइल हॅण्डसेटही दुय्यम दर्जाचे असल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आजही नेटवर्क मिळत नसल्याने त्या ॲपवर माहिती भरणे सोडाच ते हॅण्डसेट म्हणजे घरातील खेळणेच असल्याप्रमाणे आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल हॅण्डसेट त्यांनी आंदोलन करून शासनाला परत केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या संघटना अनेकदा आंदोलने करून शासनाकडे आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र, त्यांचे प्रश्न, समस्या, मागण्या शासनाने कधीही गंभीरतेने घेतलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रश्न कोण सोडवणार, त्यांचे प्रश्न कधी सुटणार, त्यांना कोणी वाली आहे की नाही?

Web Title: When will the problem of Anganwadi workers be solved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.