कधी येणार शहाणपण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:28 AM2021-08-01T04:28:33+5:302021-08-01T04:28:33+5:30
रत्नागिरी मावळ तालुक्यातील भाजे गाव, महाड तालुक्यातील जुई गाव, आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव, खेड तालुक्यातील पोसरे - बाैद्धवाडी या ...
रत्नागिरी
मावळ तालुक्यातील भाजे गाव, महाड तालुक्यातील जुई गाव, आंबेगाव तालुक्यातील माळीण गाव, खेड तालुक्यातील पोसरे - बाैद्धवाडी या मोठ्या घटनांमध्ये गेलेले साधारण दोनशे बळी, छोट्या-छोट्या घटनांमध्ये गेलेले शेकडो बळी, घरांचे अफाट नुकसान आणि तरीही न आलेले शहाणपण. महापूर, दरडी कोसळणे या घटना दिसायला नैसर्गिक असल्या तरी त्या घडण्याला तुम्ही-आम्हीच कारणीभूत आहोत. सह्याद्रीच्या डोंगराला आपणच दिलेल्या धडका आता आपल्याच मानगुटीवर बसू लागल्या आहेत. माणसाने निसर्गाला धक्का दिला की निसर्ग त्याची पोचपावती देतोच. तशीच पोचपावती आता महापुराच्या आणि दरडींच्यानिमित्ताने मिळत आहे. आता तरी आपण दखल घेणार आहोत का?... शहाणे होणार आहोत का?
चिपळूण आणि खेडला महापूर आला. आजवर पाहिलेला नाही, असा महापूर आला. चिपळूणकरांना २२ जुलै रोजी गुरुवारी पहाटे झोपेतून जाग आली ती भरलेल्या पाण्यानेच. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळनंतर पाणी कमी होऊ लागले. अख्खी काळोखी रात्र हजारो चिपळूणकरांनी पुराचे पाणी आणि भीतीच्या छायेत घालवली. दुपारी परिस्थिती बरीचशी निवळली. पण मनात बसलेली भीती दूर व्हायला काही काळ जावा लागेल. पूर आल्यानंतर किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यानंतर दोन गोष्टी प्राधान्याने होतात. मंत्रीवर्ग उठसूठ दाैरे करायला लागतात, सहानुभुती द्यायला लागतात आणि दुसरं म्हणजे कारणे शोधली जातात. रोगावर उपाय काय, याची चर्चा होते. दुर्दैव हेच आहे की चर्चा उपायांची होते. रोगाचे कारण शोधलेच जात नाही. कारण ते शोधल्यानंतर उत्तर काय येणार, हे माहीत आहे आणि त्यात आपले हितसंबंध गुंतले असल्याने त्या कारणांवर इलाज करताच येणार नाही, हे साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे या कारणांच्या मागे कोणी जात नाही.
पूर आला. त्यावर काय उपाय करायचा? नद्यांमधला गाळ काढायचा उपाय अनेकांनी पुढे केला. वर्षानुवर्षे नद्या गाळाने भरलेल्या आहेत. त्या साफ केल्या जात नाहीत. जिथे गाळ काढला गेलाय, तिथे पूर आला का? अशा उदाहरणांसह गाळ उपसण्याच्या नावाने टीकेचा उपसा होतो. गाळ काढायला हवाच आहे. नद्या, खाड्या गाळाने भरुन गेल्या आहेत. त्यामुळे नद्यांची पात्रे रुंदावत आहेत. पण हे काम खर्चिक असल्याने लगेचच हाती घेतले जाणार नाही. त्यात वेळ जाईल. कदाचित त्यासाठी वेगवेगळे पर्याय हाताळून गाळ उपसा होईलही. पण हे किती दिवस? नद्यांमध्ये गाळ येतच राहणार. याचं मुख्य कारण आहे, आपण सह्याद्री उघडाबोडका करत आहोत. कागदावरच राहिलेली कुऱ्हाडबंदी आणि वाढत्या गरजा यामुळे जंगलतोडीला मर्यादाच राहिलेली नाही. हेच आपल्या सर्वांच्या नाशाचे कारण होणार आहे. होय! आपण त्याकडे कधी गांभीर्याने पाहतच नसल्याने हेच आपल्या सर्वांच्या नाशाचे कारण ठरणार नाही.
हजारो वर्षे ज्याच्यामुळे कोकणात मुबलक पाऊस पडत आहे, त्या सह्याद्रीच्या डोंगराचे कुरतडणे आपण नित्यनेमाने सुरू ठेवले आहे. कधी लाकडासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते, तर कधी खनिजांच्या हव्यासापाेटी मोठ्या प्रमाणात खोदकाम (मायनिंग) होते. लहानपणी एस. टी.तून मुंबईला जाताना हिरवेगार डाेंगर दिसायचे. आता डोंगरांचा रंग बदललाय. तिथली हिरवळ कमी झाली आहे. विकासासाठी आपण या हिरवळीचे वाळवंट करायला निघालो आहोत. मोठ्या प्रमाणात होणारे खाेदकाम आणि वर्षानुवर्षे डोंगर धरुन ठेवलेली वनराई तोडून आपणच डोंगर ठिसूळ केले आहेत आणि आता हेच ठिसूळ डोंगर अतिवृष्टीच्या पाण्यासोबत टप्प्याटप्प्याने नद्यांमध्ये येत आहेत. गाळाची समस्या सुरु होते ती इथूनच.
निसर्ग हा कधीही मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण निसर्गावरच मात करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे पुष्परिणाम असंख्य बाजूंनी भोगतोय. आता तरी शहाणे व्हायची वेळ आली आहे. पर्यावरणाशी समतोल राखत विकास ही संकल्पना पुढाऱ्यांच्या भाषणापुरती मर्यादीत न राहता सर्वसामान्य लोकांनी ती अमलात आणायला हवी.