आता कुठे गेली जातपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:25+5:302021-07-29T04:31:25+5:30
माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता ...
माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता तरी अक्कल आली तर बरे होईल, तसेच लोकांनी आता तरी शहाणे व्हावे. नाहीतर जाती-धर्माच्या नावाखाली आग लावणारे लोकच सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या-त्या वेळी जात, धर्म विसरुन सर्वच जण एकमेकांसाठी धावून आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. असे असतानाही काही जण सामाजिक ऐक्य बिघडविण्यासाठी जातीयतेचे, धर्माधर्माचे विष पेरुन वाद निर्माण करण्याचे काम उत्तमपणे पार पडतात आणि आपल्यासारखे अनेक जण त्याला बळी पडतात. त्यामुळे नुकसान कोणाचे होते, याकडे आपण दुर्लक्ष करून या विखारी माणसांच्या पाठीशी धावून सर्वांचेच नुकसान करून घेतो. असे प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू आहेत. माणूस शिकला सवरलेला असतानाही जातीयता, धर्माधर्मातील तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध झालेला नाही; मात्र आपलंच नुकसान करून जातीयतेला थारा देण्याचे काम करीत आहे. हे कुठे तरी बदलले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक धर्माच्या लोकांनी धार्मिकतेचा बुरखा घेतलेला मग तो हिंदू असो वा मुसलमान असो, अशा लोकांना बाजूला करण्याचे काम प्रत्येकानेच करायला पाहिजेत.
पर्यावरणातील सततच्या बदलामुळे कधी अतिवृष्ष्टी, अवकाळी पाऊस, महापूर, उन्हाळा आपण अनुभवत आहोत. नुकतेच अतिवृष्टीमुळे महापुराच्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. या कठीण कालखंडात सर्वच व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. सामाजिक संस्था, संघटना, शासन आणि इतर लोकांनी मदतीचा हात दिला. धान्य, कपडे आदि जीवनाश्यक वस्तू या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच आहे. घरांची झालेली पडझड, शेतीचे नुकसान, व्यापाऱ्यांचे नुकसान असे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो हात मदतीला धावत आहेत. नुकसान झाले आहेच. शिवाय यापुढे येणाऱ्या महामारीला तोंड कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीमध्ये आलेल्या महापुराने सर्वांनाच उद्ध्वस्त केले आहे. या महापुरामध्ये काही दिवस लोक अन्नपाण्यावाचून तडफडत होते. डोक्यावर नैसर्गिक संकट असतानाच पोटात काहीही नसल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला होता. यामध्ये काहींचे नातेवाईकही दगावले. जनावरे तर कुठे बेपत्ता झाली, हेच समजले नाही. अशा परिस्थितीमध्ये कोण कोणासाठी धावून आला, हे कोणालाही माहीत नाही. कोणाचा कोणी जीव वाचवला, हेही कोणाच्या ध्यानीमनी नाही. जे पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी पुढे सरसावले त्यांना जात-धर्म नव्हता. मग आम्ही जातीयतेचे ओझे घेऊन एखाद्याच्या सांगण्यावरून तसेच चिथावण्यावरून का म्हणून धावून जायचे, असा प्रश्न उपस्थित केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने माणुसकीपेक्षा दुसरे काही नाही, असा विचार केल्यास तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक बसेल.