Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश
By संदीप बांद्रे | Published: June 26, 2023 11:59 AM2023-06-26T11:59:41+5:302023-06-26T12:10:46+5:30
चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व ...
चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोटे येथे महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली.
मिलींद वसंत सावंत (वय-५५ रा, मालाड, मुंबई) व मिना मोहन कोटिया (६२ रा. लोटे, ता. खेड) या दोघांकडून खवले मांजराचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले.
याबाबत माहिती अशी की, लोटे येथे दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्रीसाठी येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी चिपळूण यांना मिळाली. माहितीनुसार लोटे येथे महामार्गावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. लोटे येथे काल रविवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आले. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले.
ही कार्यवाही दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक सातारा) यांचे नेतृत्वामध्ये पी. जी. पाटील, परिक्षेत्र वनअधिकारी दापोली, वैभव बोराटे (परिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी) यांचेमार्फत करणेत आली. या धडक मोहिमेत सुरशे उपरे वनपाल खेड, साताप्पा सावंत वनपाल दापोली, उमेश आखाडे वनपाल सावर्डे, तसेच शुभांगी गुरव वनरक्षक, अशोक ढाकणे वनरक्षक, अश्विनी जाधव वनरक्षक कृष्णा इरमले वनरक्षक, हे सहभागी होते. पुढील तपास पी. जी. पाटील परिक्षेत्र वनअधिकारी दापोली व राजश्री किर परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण हे करीत आहेत.