धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून तरुण डोहात बुडाला, राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:58 PM2023-06-02T12:58:49+5:302023-06-02T12:59:13+5:30
सुमारे तीस फूट खाेल धबधब्याच्या डाेहात काेसळला
राजापूर : धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून १८ वर्षीय तरूण खाेल डाेहात बुडाल्याची घटना साैंदळनजीकच्या ओझरकाेंड (ता. राजापूर) येथे बुधवारी (३१ मे) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. नितीन मंगेश माेहिते (रा. साैंदळ, राजापूर) असे तरुणाचे नाव असून, गुरुवारीही त्याचा शाेध सुरू हाेता.
नितीन मंगेश मोहिते आणि त्याचे काही सहकारी मित्र परिसर पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी घराबाहेर पडले होते. फिरत फिरत ते सौंदळनजीक ओझरकोंड येथील धबधब्यावर गेले हाेते. तिथे फेरफटका मारत असताना नितीन मोहिते याला उंचावरून सेल्फी काढण्याची इच्छा झाली. त्यासाठी ताे तेथीलच एका उंच खडकावर गेला हाेता. तिथे सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि सुमारे दोन फूट उंचावरून सुमारे तीस फूट खाेल धबधब्याच्या डाेहात काेसळला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने त्याचे सहकारी हादरून गेले. त्यांनी नितीनला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. नितीन डाेहात बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी धबधब्याच्या दिशेने धाव घेतली. बुडालेल्या नितीनचा ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे सापडला नाही. ग्रामस्थांनी गुरुवारीही (१ जून) त्याचा शाेध सुरू ठेवला हाेता. मात्र, त्याचा काेठेच शाेध लागला नाही.
स्कुबा डायव्हर दाखल
धबधब्याच्या डाेहात बुडालेल्या नितीन माेहिते याचा शाेध घेण्यासाठी स्कुबा डायव्हर यांना बाेलावण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही त्याचा शाेध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबराेबर शासकीय यंत्रणेसह पाेलिस कर्मचारी व ग्रामस्थही शाेध कार्यात मदत करत हाेते.