काम सुरू असतानाच महावितरणचा खांब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:42 PM2019-07-24T12:42:16+5:302019-07-24T12:43:49+5:30
नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.
रत्नागिरी : नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.
सोमवार हा दिवस महावितरणसाठी देखभाल, दुरूस्तीसाठी ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे यादिवशी जास्तीत जास्त कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. शहरातील हॉटेल कार्निव्हलजवळ नव्याने वीजखांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा खांब बसविण्यासाठी जुन्या खांबावरील तारा कापण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू होते. यातील काही तारा कापल्यानंतर हॉटेलच्या शेजारी उभ्या असणाऱ्या वीजखांबावर तारांचा भार आला. त्याबरोबर हा खांब वाकून जमिनीवर कोसळला.
दरम्यान, याठिकाणी अन्य दुकाने व कार्यालय असल्याने वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली असतात. मात्र, हे काम करताना तेथील नागरिकांना कोणतीच कल्पना न दिल्याने ही वाहने तेथेच उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा खांब कोसळल्यानंतर त्याचठिकाणी उभी करून ठेवलेली चारचाकी गाडी सुदैवाने बचावली. हा खांब कोसळला त्याचवेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का कोसळला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला किरकोळ दुखापती झाली असून, जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकारानंतर वाहतूक शाखेचे पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले होते. तर खांब खाली कोसळताच तेथील नागरिकांनी बाहेर येऊन याबाबत विचारणा केली. याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोसळलेल्या खांबावरील तारा बाजूला करण्याचे काम हाती घेतले. पण याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते बराचवेळ तेथे न आल्याने नागरिक संतप्त झाले होते.
हे काम करण्यापूर्वी येथील नागरिकांना का सांगण्यात आले नाही? कामाची पूर्वकल्पना दिली असती तर वाहने हटविता आली असती, असेही नागरिकांनी सांगितले. वाहनांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, जबाबदार अधिकारीच न आल्याने त्यांना उत्तरे मिळत नव्हती.