कोकण रेल्वेतून बिनबोभाट मद्य तस्करीला आळा घालणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:05 PM2017-10-31T16:05:48+5:302017-10-31T16:17:25+5:30

राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्या ताकदीपुढे आणि उत्पादन शुल्क खात्याशी नसलेल्या समन्वयामुळे अनेक केसेस उघडच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Who is going to prevent smuggling of alcohol from the Konkan Railway? | कोकण रेल्वेतून बिनबोभाट मद्य तस्करीला आळा घालणार कोण?

कोकण रेल्वेतून बिनबोभाट मद्य तस्करीला आळा घालणार कोण?

Next
ठळक मुद्देकोकण रेल्वेतून बिनबोभाट वाहतूकमोजकीच होते कारवाईकोकण रेल्वेकडे अपुरे मनुष्यबळ

विहार तेंडुलकर

रत्नागिरी ,दि. ३१ : राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्या ताकदीपुढे आणि उत्पादन शुल्क खात्याशी नसलेल्या समन्वयामुळे अनेक केसेस उघडच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

कोकण रेल्वेकडे सद्यस्थितीत असलेल्या आरपीएफ जवानांच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रत्येक रेल्वेची तपासणी करणे अशक्य होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मद्यवाहतूक करणाऱ्या केवळ २७जणांना आरपीएफ व उत्पादन शुल्क खात्याने अटक केली आहे.
कोकण रेल्वेच्या अखत्यारित महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर स्थानक असा ७४० किमीचा मार्ग येतो. या मार्गावर केवळ १२९ आरपीएफचे जवान आहेत.

कोकण रेल्वेने गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन महत्त्वांच्या राज्यांना जवळ आणले आहे. गोव्यात मद्य स्वस्त मिळत असल्याने त्याठिकाणाहून रेल्वेमार्गे मोठ्या प्रमाणावर चोरटी मद्यवाहतूक चालते. मात्र, कोकण रेल्वेकडे ही वाहतूक रोखण्याचे प्रभावी उपायच नसल्याने या वाहतुकीला आळा कसा घालणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.

दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुट्टीचा हंगाम, गणेशोत्सव, दिवाळी, वर्षअखेर अशा काळात मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे केवळ १२९ जवानांच्या खांद्यावर एवढ्या संपूर्ण संपत्तीची आणि सुरक्षेची जबाबदारी येते.

गोव्यातून शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये मद्याची वाहतूक होते. गोव्यात मद्यावर नाममात्र अबकारी कर आकारला जातो. त्यामुळे आपल्या राज्यातील हा कर चुकवण्यासाठी गोव्यातून मोठ्या प्रमाणावर मद्य आणले जाते. हे मद्य सापडल्यास आरपीएफचे जवान राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सहाय्याने जप्त करतात आणि आरोपीसह जप्त मुद्देमाल उत्पादन शुल्क खात्याच्या ताब्यात दिला जातो.


आरपीएफ आणि उत्पादन शुल्क खात्याच्या कचाट्यातून हा माल सुटला तर तो दुप्पट किमतीने (जी किंमत महाराष्ट्रात मिळणाºया मद्यापेक्षाही कमी असते.) महाराष्ट्रात विकला जातो. ‘स्वस्त आणि मस्त’ या न्यायाने या मद्याला मागणीही मोठी असते. या विक्रीमुळे महाराष्ट्राला मद्यविक्रीतून मिळणारा अबकारी कर न मिळाल्यामुळे शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे.


यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर २५०पेक्षा जास्त विशेष रेल्वेगाड्या कोकण रेल्वेने सोडल्या होत्या. तेवढ्याच गाड्या उन्हाळी, दिवाळी आणि वर्षअखेरीला सोडल्या जातात. गणेशोत्सवात गौरीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर मद्याची उलाढाल होत असते. कोकण रेल्वेची अपुरी सुरक्षा यंत्रणा आणि उत्पादन शुल्क खाते-कोकण रेल्वे यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे कोकण रेल्वेतून बिनबोभाटपणे मद्याची वाहतूक सुरु असते.


अल्प प्रमाणातच कारवाई

अपुरी यंत्रणा आणि समन्वयाचा अभाव यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून बिनबोभाटपणे मद्यवाहतूक सुरु असते. २०१६पासून आतापर्यंत कोकण रेल्वेने ३.२८ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या ४ हजार ४२७ बाटल्या जप्त केल्या आणि २७जणांना अटक केली. २०१५मध्ये २.६८ रुपये किमतीच्या ३ हजार ९३६ बाटल्या आणि १२ जणांना अटक केली. यावरून मद्यवाहतुकीवर किती कमी प्रमाणात कारवाई होते, याची प्रचिती येते.

आरपीएफच्या जवानांनी केलेल्या केसिस

२०१३-५४५
२०१४-६०७
२०१५-४८३
२०१६नंतर-५२२

‘धुम्रपान’अंतर्गत खटले

२०१४-१८९
२०१५-४४०
२०१६ ते आजपर्यंत-३८८

मद्यवाहतूक रोखायची कुणी?

या प्रकरणात कोकण रेल्वेने उत्पादन शुल्क खात्याकडे बोट दाखवले आहे. मद्यवाहतूक रोखणे हे राज्य उत्पादन शुल्क खाते आणि पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. आरपीएफ जवानांचे कर्तव्य हे केवळ प्रवाशांची सुरक्षितता जपणे हे आहे. त्यामुळे मद्यवाहतूक रोखायची कुणी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

प्रवासी सुरक्षितताही वाऱ्यावर


कोकण रेल्वेने आरपीएफ जवानांचे कर्तव्य प्रवासी सुरक्षितता हे असल्याचे सांगितले असले तरी प्रवाशांची सुरक्षितताही वाऱ्यावरच आहे. रेल्वेअंतर्गत होणाऱ्या चोऱ्या, हाणामारी यापासून बऱ्याचवेळा आरपीएफचे जवान अनभिज्ञ असतात. विशेष म्हणजे स्थानकात रेल्वे आली आणि कुणाला तक्रार करावयाची असली तर कमी संख्येने असलेल्या आएपीएफच्या जवानांमुळे रेल्वे सुटेपर्यंत तेथे जवान सापडेल का? हाही प्रश्नच असतो. त्यामुळे रेल्वेने प्रवासी सुरक्षितता तरी जपलेय का? असा प्रश्न केला जात आहे.

महत्वाच्या स्थानकांवरच जवान

कोकण रेल्वेने प्रवासी सुरक्षितता केवळ अतिमहत्त्वाच्या स्थानकांवरच जपली आहे आणि त्याठिकाणीही ती अपुरीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी स्थानकावर १८, तर चिपळूण येथे ९ जवान कार्यरत आहेत. खेड हे मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांसाठी महत्त्वाचे स्थानक असूनही तेथे आरपीएफ नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे ८ जवान कार्यरत आहेत.

Web Title: Who is going to prevent smuggling of alcohol from the Konkan Railway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.