जीव धोक्यात घालणाऱ्या ग्राम कृती दलाला वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:35+5:302021-04-22T04:32:35+5:30
देवरुख : कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्राम कृती दलातील सदस्य आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक गावामध्ये काम करत ...
देवरुख : कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्राम कृती दलातील सदस्य आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक गावामध्ये काम करत आहेत. मात्र, यांना वाली कोण, असा प्रश्न कोंडअसुर्डेचे सरपंच श्रीराम शिंदे यांनी तालुक्यातील ग्राम कृती दलाच्या वतीने केला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता ग्राम कृती दलात काम करणारे सदस्यच कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. अशा वेळी या कोविड योद्ध्यांना शासनाकडून कोणतेच संरक्षण मिळत नाही. त्यामुळे ग्राम कृती दलांंनी आपला जीव धोक्यात घालून कसे काम करायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.
शासनाने याचा विचार करून ग्राम कृती दलाच्या संरक्षणासाठी विमा किंवा अन्य योग्य ती उपाययोजना करून त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी संगमेश्वर तालुक्यातील ग्राम कृती दलातील सदस्यांकडून करण्यात येत आहे. गावात पॉझिटिव्ह रुग्णांचे होम आयसोलेशन केले जाते, तेव्हा ही ग्राम कृती दलेच महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी ते सदस्य प्रसंगी धोका पत्करत असतात. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना कोणतेच विमा संरक्षण नसते. म्हणून याचा विचार प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी करणे गरजेचे झाले आहे.