देव तारी त्याला कोण मारी, ७० वर्षीय आजोबांना बुडताना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:09 PM2021-07-16T18:09:09+5:302021-07-16T18:09:54+5:30
Drowning Case : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावातून कोंडिवरे येथे जाण्यासाठी मोठा पूल आहे. सतत गेले सहा दिवस पडणाऱ्यामुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत
मनिष दळवी
असुर्डे (ता. चिपळूण) : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे आला. सत्तर वर्षाचे एक आजोबा पुलावरून पडले आणि नदीच्या वाढलेल्या पाण्यातून वाहून जाऊ लागले. वाहता वाहता सुदैवाने एक झाड लागले आणि बराचवेळ ते एका झाडाला धरून राहिले. एका दुचाकीस्वाराच्या हे लक्षात आले आणि त्याने ग्रामस्थांना बोलावून आणले. दोन तरुणांनी पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहात झोकून देत त्या आजोबांना किनाऱ्यावर सुखरुप आणले. राजा आत्माराम घाग असे त्यांचे नाव आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी गावातून कोंडिवरे येथे जाण्यासाठी मोठा पूल आहे. सतत गेले सहा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अश्यातच शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजा आत्माराम घाग हे (वय ७०) हे कोंडिवरे पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरला व ते थेट पाण्यात पडले.
पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ते पोहणारे असूनही पाण्यासोबत वाहू लागले. पाण्याची तीव्र गती असल्यामुळे ते हतबल झाले. शेवटी त्यांनी एका मोठ्या झाडाचा आधार घेतला व बराच वेळ त्यांनी झाडाला घट्ट पकडून राहिले. याच वेळी तिथून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना वाहत जाताना पाहिले. त्याने तत्काळ कळंबुशी गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र झगडे यांना फोन केला व बघितलेला प्रकार सांगितला.
देवेंद्र यांनी हातातील काम टाकून नदीकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत दर्शन झगडे, दत्ताराम झगडे, रवींद्र झगडे, गणपत चव्हाण, सचिन चव्हाण, ऋतिक झगडे, रितेश घाग यांनीही धाव घेतली. परंतु घाग यांना पाण्याबाहेर आणण्यासाठी यासाठी तरबेज पोहणाऱ्याची गरज होती. अशा वेळी माखजन कुंभार वाडीतील अमित गोपाळ कुंभार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदी पात्रात उडी घेतली. अमित कुंभार व देवेंद्र झगडे दोरी घेऊन राजा घाग यांच्या पर्यंत पोहोचले व त्यांच्या कंबरेला दोरी बांधून नदी किनारी आणले. यासाठी माखजन पोलीस स्टेशनचे पोलीस शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.