संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 04:07 PM2019-12-28T16:07:14+5:302019-12-28T16:08:23+5:30
कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.
रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.
रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेले भाजप उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक शहरे उदयाला येऊन भरभराटीला आली. त्या शहरांमध्ये कारखानदारी आली. व्यापार वाढला. नवीन वसाहती उभ्या राहिल्या. त्या शहरांना ज्या मुख्य १८ सुविधा आवश्यक होत्या त्या पुरविल्या गेल्या.
राज्यात अशी अनेक शहरे आहेत. परंतुु रत्नागिरी इतके जुने व ऐतिहासिक शहर असूनही येथील तरुणांच्या हाताला रोजगार, नवीन उद्योग येथे आले नाहीत. भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक प्रभागांमधील उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचा उपद्रव मोठा आहे. अतिशय निसर्गरम्य शहर असूनही येथे रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य अशा १८ चांगल्या नागरी सुविधांसह हे शहर स्वच्छ सुंदर बनविता आले असते. पण शिवसेनेकडून काहीच झाले नाही.
रत्नागिरी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का, नागरिकांना सुरक्षितता आहे का, याचा विचार करता नगर परिषदेतील शिवसेनेचे नेते याला जबाबदार आहेत. मुंबई ही देशातील सर्वात भ्रष्ट महानगर पालिका म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे नावही आहे. त्यामुळे या शहराचा कायापालट करायचा असेल तर जनतेने मतांचे परिवर्तन करावे, भाजपचे उमेदवार पटवर्धन यांना संधी द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.
रत्नागिरी शहर विकासाच्या बाबतीत मागे राहिले, याला येथे अनेक वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता हे कारण आहे. येथील नगर परिषद व जिल्हा परिषद अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तरीही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. १८ नागरी सुविधांसह रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर बनविता आले असते. परंतु या नगर परिषदेमध्ये सत्तेत बसलेल्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. कारभार करणारे तेवढे धनाढ्य झाले, असा घणाघाती आरोपही राणे यांनी केला.