समोर कोणीही येऊदे, आम्ही भिडणार - आमदार शेखर निकम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:33 PM2023-08-29T16:33:34+5:302023-08-29T16:33:59+5:30
महायुतीच्या समन्वय समितीचे संकेत
चिपळूण : आमदार भास्कर जाधव हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. चिपळूणमधील उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही ते माहित नाही. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील, त्या उमेदवारासमोर कोणताही उमेदवार असला, तरी आम्ही त्याला भिडणार अशा शब्दात आमदार शेखर निकम यांनी ठणकावले.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव हे गुहागरऐवजी चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यात चिपळूणसह पाचही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवू, असे स्पष्ट केले होते. याविषयी आमदार शेखर निकम यांना सोमवारी (२८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत छेडण्यात आले.
त्यावेळी ते म्हणाले की, मुळातच आमदार जाधव हे राज्याचे नेते असल्याने त्यांच्या वक्तव्यांवर मी प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील. त्यांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे नाही, आपल्या ऐवजी पक्षाने दुसरा उमेदवार दिला तरी त्याचे काम जोमाने करण्याची तयारी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज विविध विकासकामांसाठी महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत स्थानिक पातळीवरील विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती मिळालेली दिसेल, असेही आमदार निकम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, आदिती देशपांडे, शिवानी पवार, उदय ओतारी, सचिन साडविलकर, विशाल जानवलकर उपस्थित होते.
समन्वय समितीचे संकेत
सत्तेत सहभागी असलेले महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या स्तरावर काम करीत आहे. परंतु, भविष्यात या राजकीय पक्षांमध्ये समन्वय राहण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामध्ये महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. त्यामुळे आजच्या घडीला वेगवेगळ्या स्तरावर महायुतीचे काम सुरू असले तरी भविष्यात एकत्रितपणे महायुती भक्कमपणे काम करताना दिसेल.