अख्खे कुटुंब कोरोनाबाधित; तरीही दु:ख बाजूला ठेवून चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:52+5:302021-05-20T04:33:52+5:30

रत्नागिरी : आई-वडील पाॅझिटिव्ह, चार दिवसांनंतर तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगाही पाॅझिटिव्ह झाल्याचा अहवाल. त्यादिवशी चिमुकल्याचाही पहिला वाढदिवस. ...

The whole family coronated; Still celebrating the first birthday of Chimukalya, putting grief aside | अख्खे कुटुंब कोरोनाबाधित; तरीही दु:ख बाजूला ठेवून चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा

अख्खे कुटुंब कोरोनाबाधित; तरीही दु:ख बाजूला ठेवून चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा

Next

रत्नागिरी : आई-वडील पाॅझिटिव्ह, चार दिवसांनंतर तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगाही पाॅझिटिव्ह झाल्याचा अहवाल. त्यादिवशी चिमुकल्याचाही पहिला वाढदिवस. रात्रंदिवस कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या साहाय्यासाठी धावून जाणाऱ्या रत्नागिरीतील हेल्पिंग हँडस्‌च्या टीमला ही माहिती मिळताच शहरातील शिर्के प्रशालेत त्याचा वाढदिवस साजराही झाला आणि दु:खालाही सुखाची किनार मिळाली.

आई-वडील चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाले. डोक्यावर आकाशच कोसळले. पदरी जेमतेम वर्षाचा मुलगा मिहीर आणि तीन वर्षांची मुलगी काव्या. यावेळी मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या दु:खातही आपली मुले सुरक्षित असल्याचा आनंद होता. त्यांना काही त्रास होऊ नये, म्हणून रत्नागिरीत मावशीकडे या दोघांनाही ठेवण्याचा निर्णय जड मनाने दोघांनीही घेतला आणि पती-पत्नी दोघेही रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले.

पण पाच दिवसांनंतरही दोन्ही मुलांची चाचणी करण्यात आली आणि जी भीती होती तेच घडले. ही दोन्ही मुले पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. आई-वडील, तर रायपाटणमध्ये होते. अखेर या चिमुकल्यांना तिकडे पाठविण्यापेक्षा त्यांच्या आई-वडिलांनाच रत्नागिरीमध्ये शिफ्ट करायचे असे ठरविण्यात आले. हेल्पिंग हँडस्‌चे कार्यकर्ते, राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना तशी विनंती केली आणि ती मान्यही झाली. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी त्यांच्या एकत्र राहण्याची सोयसुद्धा केली. आई-वडील तिकडून रत्नागिरीमध्ये येईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले.

जेव्हा ते रत्नागिरीत आले तेव्हा हेल्पिंग हँडस्‌चे दुसरे कार्यकर्ते सचिन केसरकर यांना छोट्या मिहीरचा पहिला वाढदिवस असल्याचे समजले. ही बातमी सर्व कार्यकर्त्यांना कळताच रुग्ण आणि त्यांच्या सुख-दु:खात समरस होणारे हे कार्यकर्ते गप्प बसतील, असे घडणे अशक्यच. तातडीने केक उपलब्ध करण्यात आला आणि कोरोना चाचणीच्या ठिकाणीच मिहीरचा पहिलावहिला वाढदिवस आई-बाबांसोबत साजरा झाला अगदी अनपेक्षितपणे. अख्खे कुटुंब पाॅझिटिव्ह आल्याने घरापासून दूर असले तरीही हेल्पिंग हँडस्‌च्या कार्यकर्त्यांमुळे आपल्या बाळाचा पहिलावहिला वाढदिवस अनपेक्षित साजरा झाला. त्यामुळे त्या पती-पत्नीच्या एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू, अशी स्थिती झाली होती.

दु:खाला सुखाची किनार

आपण पाॅझिटिव्ह आलो आहोत, आता आपले वर्षाचे बाळ आपल्याशिवाय काही दिवस का होईना कसे राहणार, ही चिंता आईला सतावत होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मुलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, त्याचदिवशी छोटा मुलगा मिहीर याचा पहिला वाढदिवसही होता. मात्र, त्याच दिवशी त्याचाही अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्याला आईचीही कूस मिळाली.

Web Title: The whole family coronated; Still celebrating the first birthday of Chimukalya, putting grief aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.